You are currently viewing पोरकी झालेल्या तीन मुलांना मदतीचा हात देतील का?

पोरकी झालेल्या तीन मुलांना मदतीचा हात देतील का?

संपादकीय….

आजगाव वाघबिळ येथे दारूच्या नशेत भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर ने धडक देऊन तीन दुचाकींना अपघात झाला होता. डंपरच्या जोरदार धडकेत शिरोडा बाजारपेठेतून भाजी विक्री करून घरी परतणारे आजगाव येथील मधुकर रेवाडकर आणि त्यांची पत्नी मधुमती रेवाडकर हे दाम्पत्य मृत्युमुखी पडले होते. मधुमती रेवाडकर ह्या जागेवरच मृत्युमुखी झाल्या होत्या तर मधुकर रेवाडकर हे रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच गतप्राण झाले होते.
मोलमजुरी, भाजीविक्री करून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणारे हे दाम्पत्य दारूच्या नशेत बेभान होऊन बेदरकारपणे डंपर चालविणाऱ्या ड्राइवर च्या चुकीच्या गाडी हाकण्यामुळे गतप्राण झाले आणि त्यांची तीन लहान मुले मात्र आपल्या आई-वडिलांना मुकली. कोवळ्या वयात तीन मुलांच्या डोक्यावरून त्यांच्या आई वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे आई बापाविना पोरकी झालेली ही मुले धक्क्यातून सावरलेली नाहीत. लहान वयात आई बापाचे निधन झाल्यावर उरलेलं आयुष्य कसं जगायचं हाच प्रश्न आज त्या मुलांसमोर आ वासून उभा आहे. आज घरावर संकट आलंय, परंतु ते उद्या जाणार नसून भविष्यात संकटांना तोंड देताना देखील तारेवरची कसरत आहे याची देखील चिंता त्यांना भेडसावत असणार.
आई वडिलांच्या हात कोवळ्या वयात डोक्यावरून गेल्यामुळे दुःख तर आहेच परंतु पुढे जगायचं कसं? या छोट्या मुलांच्या खाण्याचा, शिक्षणाचा खर्च उचलणार कोण? कोणाचा आधार त्यांना मिळणार असे अनेक प्रश्न उभे राहतात. संकटे ही आयुष्यात प्रत्येकावर येतात, त्यात गरीब श्रीमंत हा भेदभाव नसतो. परंतु जेव्हा गरिबांवर संकट येतं तेव्हा मात्र त्या संकटांशी दोन हात करायला त्यांच्या जवळ मानसिक आणि आर्थिक दोन्ही ताकदी नसतात, त्यामुळे गोरगरीब संकटांपुढे तुटून जातो. आज या मुलांवर आलेल्या संकटाच्या वेळी प्रत्येकाने त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांना जेव्हा आपण आधार देतो तेव्हाच आपल्या आधारासाठी परमेश्वर देखील धावून येतो.
समाजातील दानशूर व्यक्तिमत्वांनी, समाजकार्यकर्त्यांनी, लोकांनी पुढे येत अचानक आई वडिलांचे छत्र हरवल्यामुळे पोरक्या झालेल्या रेवाडकर यांच्या तिन्ही मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक मदत देणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने शक्य असेल त्यानी पुढे येणे गरजेचे आहे. आजगाव येथील या रेवाडकर कुटुंबास मोलाचा आर्थिक हात आणि साथ देऊन सढळ हस्ते मदत केल्यास ही छोटी मुले देखील भविष्यात समाजात ताठ मानेने उभी राहू शकतील आणि सामाजिक भावना देखील त्यांच्या मनात कायम राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 9 =