आंबोली-सावंतवाडी राज्य मार्ग पाण्याखाली
सावंतवाडी
बुधवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली–सावंतवाडी राज्य मार्गावरील माडखोल धवडकी येथे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.
या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी दिली. तब्बल दीड तासांपासून या ठिकाणी पाणी साचले असून, वाहनधारकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीबाबत संबंधित पथकाला माहिती देण्यात आली आहे.
शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल होईपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत, येणाऱ्या वाहनांना थांबवून अपघात टाळण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
