*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भेट तुझी माझी बाप्पा*
रोज पाहते मी तुला
रूपे तुझे कितीतरी
शुभंकर मांगल्याचा
वास तुझा चराचरी..
सुमनांच्या गंधात तू
पवनाच्या झोक्यात तू
जलदांच्या धारात तू
यत्र तत्र सर्वत्र तू…
नेत्र मिटता आकारसी
वक्रतुंड लंबोदरा
स्वरूपात दिव्य दिसे
क्षण आशेचा तो खरा..
स्पंदनात त्या प्रत्येकी
तुझे माझे द्वैत नाही
भेट तुझी माझी बाप्पा
मना देत असे ग्वाही…
शिवपुत्रा गजानना
हेच मागणे मागते
स्थिर बुद्धी देई मला
धर्म वचना जागते..
*राधिका भांडारकर*

