दोडामार्ग बाजारपेठेतील पेट्रोल कॅनला आग! नागरिकांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना
दोडामार्ग:
दोडामार्गच्या मध्यवर्ती बाजारपेठेत गुरुवारी सकाळी थरकापजनक घटना घडली. एक चारचाकी वाहनातून अनधिकृतपणे पेट्रोलची वाहतूक केली जात असताना वाहनातील कॅनला अचानक आग लागली. घाबरलेल्या चालकाने पेट्रोलचा कॅन थेट रस्त्यावर फेकल्याने पेटते इंधन पसरले आणि आजूबाजूच्या काही दुकानांना आग लागली. क्षणात बाजारपेठ गोंधळात सापडली.
या धोकादायक परिस्थितीत नागरिक आणि नगर पंचायतीचे सफाई कामगार धावून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण केले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सावंतवाडी रस्त्यावरील एक मोठे कापड दुकान आणि अन्य चार-पाच दुकाने आगीच्या झळांपासून थोडक्यात बचावली. मात्र, काही दुकानांचे दर्शनी भाग जळून खाक झाले.
घटनेनंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला की, “बाजारपेठेत अशा प्रकारच्या धोकादायक अनधिकृत वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा नगर पंचायत पाऊल उचलेल.”
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, अनधिकृत इंधन वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. सुदैवाने नागरिकांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला, पण प्रशासनाचे दुर्लक्ष अजूनही कायम आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय.
