You are currently viewing गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:२८*

 

*गणपती बाप्पा मोरया*

 

काकल्याने डोक्यावरून आमचा गणपती आणला. दरवर्षीच तो आणतो. गणपती आणून, त्याला ओवाळून आसनावर म्हणजे बाकावर ठेवला. काकल्याला चहा आणि करंजी दिली. खाता खाता तो म्हणाला. “दरवर्सा तुझो गणपती न्हान सो रे?” एकंदरीत सुरवात झाली.

“अरे मूर्ती लहानच बरी.” मी म्हणालो.

“ह्या कोणी ठरयला” काकल्या.

या प्रश्नावर मात्र माझ्याकडे निश्चित उत्तर नव्हते. तरीही मी समजावत म्हणालो,

“हे बघ, कोणी ठरविण्यापेक्षा आपल्याला ते सोयीस्कर असते हे महत्वाचे. गणपती छोटा असला की तो आणणे, त्याचे विसर्जन करणे आपल्याला सोपे पडते. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. मातीची मूर्ती असली की, जसं विसर्जनाला सोपं होतं. मातीत माती मिसळून जाते तसंच हे.”

“बरा, तू बुडलतलंस केवा?” काकल्याने दुसरा प्रश्न टाकला.

“हे बघ,आधी ‘बुडयतलंस’ असं म्हणू नये. विसर्जन म्हणावं. आणखीन एक, देवाचं विसर्जन नसून मूर्तीचं विसर्जन असतं, हे लक्षात ठेवावं. असो, आमचा उत्सव दीड दिवसाचा.” मी.

“तुम्ही ठेवच्यात नाय रे चड दिस.” परत काकल्या खवचटपणे म्हणाला.

“असं काही नाही. ज्याचा त्याचा तो प्रश्न असतो.” मी

“आम्ही बाबा सात दिस ठेयतलो होतो. पून भट हुंता, साता दिसा मुळा हत. माका याक समजाना, हयल्या गणपतीकच कशी मूळा लागतत रे? घाटावयले मूळात जातत आणि आमचे मूळा हून रवतत, ह्या कसा? काकल्या बरोबर बोलला.

“अरे, यालाच अंधश्रद्धा म्हणतात. ह्याला तसं काही अर्थ नसतो.” मी माझं मत सांगितलं.

थोडा वेळ थांबून काकल्या पुन्हा बोलला,

“अवनू पूजा घालुची होती, पून तू हुंतय गणपतीत सत्यनारायण नको.” “गणेशोत्सवात गणपतीचीच पूजा करावी, असं मला वाटतं, पण इतरांचे पाय आपल्या घरी लागावेत म्हणून काही लोक सत्यनारायण पूजा घालतात, तर त्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही.

आणखीन सांगतो, उपासना आणि उत्सव यात फरक आहे. उपासना करायची तर शास्त्र जाणून करावी. उत्सव करायचा तर मग तो उत्साहाने करायचा. त्याला बंधन नाही. फक्त समाजाला त्रास होणार नाही, इतपत सांभाळून करावा एवढंच.” मी बर्‍यापैकी समजावत होतो.

“बरा भजन खेच्यात येता? उत्सवात काय तुझ्या उपासनेत?” काकल्या मला अडचणीत आणू पहात होता.

पण मी सावधपणे म्हणालो, “अरे दोन्हीतही. ती नवविधा भक्तीच आहे. शिवाय उत्सवातही भजन चांगलं. आपली संस्कृती जपली जाते.”

“बरा बाबा, आमचा भजन तरी तुका पटला. अशीच तुका गणपतीन बुद्धी देवनेत. ”

स्वतःच्या बुद्धीची फिकीर न करता माझ्या बुद्धीचं साकडं बुद्धीदात्याला घालून काकल्या चालू पडला.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा