सावंतवाडी :
घरपटी आकारणीसाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मळगाव ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सायंकाळी उशिरा करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या घरपटी आकारणीसाठी त्यांनी संबंधित अर्जदाराकडे ४० हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात अर्जदाराकडे वारंवार फोन करून त्यांनी पैशांची मागणी केली. त्रस्त अर्जदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार जाळे रचून पथकाने चव्हाण यांना सापळा लावून पकडले.
विशेष म्हणजे, ही कारवाई इन्सुली ग्रामपंचायतीत करण्यात आली. चव्हाण हे काही दिवसांपूर्वीच मळगाव ग्रामपंचायतीत प्रभारी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत झाले होते. त्यांच्यावर घरपटीसंबंधी बाबींची जबाबदारी होती. मात्र, घरपटी आकारणीसाठीच त्यांनी मोठ्या रकमेची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

