You are currently viewing मी चहा पाऊस आणि खिडकी

मी चहा पाऊस आणि खिडकी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*मी चहा पाऊस आणि खिडकी*

 

 

पाऊस पण ना खूप खोडकर… मला जेव्हा खूप वाटत की याने आज बेभान होऊन कोसळाव तेव्हाच हा नेमका दांडी मारणार आणि मग अचानक कधीतरी धो-धो कोसळणार नी बेभान होऊन बरसणार…. कधीतरी एखाद्या दिवशी हलकीशी रिमझिम सर येणार….त्याची ही वेगवेगळी रुपे पाहण्यात ही हरवून जावंस वाटतं. पावसाला धो-धो बरसताना पाहिलं ना की असं वाटतं हा पण खूप आसुसलेला असतो तिला–धरणीला भेटण्यासाठी…अर्थात त्याची वाट मी बघतच असते पण त्याच्या ओल्याशार स्पर्शाने मातीचा दरवळणाऱ्या सुगंधाची बात काही औरच…!!!

मला पावसात भिजायला खूप आवडत कारण ती मनातून भिजत असते चिंब…आठवणींमध्ये..… माझ्या काही ना काही आठवणी आहेच…मनातल्या एका कप्प्यात बंद केलेल्या…. कधी चेहऱ्यावर हसू तर कधी डोळ्यांत आसु आणणाऱ्या…. कधी गोड तर कधी कडू वाटणाऱ्या मग अशा या आठवणी खिडकीत बसून चहाच्या एक- एक घोटाबरोबर गिळून पुन्हा मनात बंद करते

मात्र गार वाऱ्यामुळे अंगावर येणारा शहारा गरम चहाच्या घोटासरशी नजरेआड होतो.

पाऊस पडायला लागला की माझे मन कल्पनेच्या विश्वातही रमत…. जिथे सर्व बंध तोडून हवी तशी कल्पना करुन मन स्वत:ला हवं तसं जगतं तिथे मन नेहमीच रेंगाळत असतं… खरचं पाऊस पडायला लागला की गरम चहाचा स्वाद घेत कोसळणाऱ्या पावसाला खिडकीतून बघत कल्पनेच्या विश्वात रमून जाण्यातही खूप मजा आहे…!

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा