*विशाल परबांची घर वापसी म्हणजे चव्हाणांकडून कुणाला शह देण्याचा प्रयत्न..?*
महाराष्ट्रात अलीकडेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे सावंतवाडी मतदारसंघातील..! सावंतवाडी मतदारसंघातून तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राजन तेली अशी लढत होईल अशी अटकळ बांधलेली असतानाच भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष लढत देणारे भाजपाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केसरकरांच्या समोर आव्हान उभे केले होते. परंतु महाराष्ट्रात भाजपा, शिंदेगट शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती असताना सावंतवाडी मतदारसंघात भाजपचा उमेदवार बंडखोरी करतो हे कुणालाही न पटणारे होते. कारण आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेचे वजनदार नेते होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील त्यांची जवळीक होती. त्यामुळे विशाल परब यांना कोणाचा तरी छुपा पाठिंबा होता, ज्यामुळे ते केसरकरांच्या विरोधात उभे ठाकले होते. विशाल परब यांच्या एका ऑडिओ क्लिप मुळे ते स्वतः आणि तत्कालीन पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण अडचणीत आले तिथेच विशाल परब यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी झाली. विशाल परब स्वतः निवडणुकीत पडलेच पण जाता जाता महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना देखील घेऊन गेले आणि महायुतीचे आमदार दीपक केसरकर मोठी बढत घेऊन विजयी झाले.
केसरकरांचा विजय झाला हा झाला इतिहास परंतु आमदार रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष वाढीचे कारण देउन विशाल परब यांचे निलंबन रद्द करून एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला किंमत न दिलेल्या विशाल परब यांच्या विनंतीनुसार त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेते असलेले नारायण राणे यांना विश्वासात न घेता भाजपामध्ये पक्ष प्रवेश देऊन चव्हाणांनी नक्की कोणाला शह दिला..? पक्षाच्या आदेशाला झुगारून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला सुद्धा दाद न देणाऱ्या विशाल परब यांना पुन्हा पक्षात सामील करून घेतले तेव्हा “हीच का शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या भाजपची शिस्त का..? असा प्रश्न साहजिकच मनाला हळूच स्पर्शून गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदारकीच्या दोन जागा आणि खासदारकी जिंकणाऱ्या राणे कुटुंबावर प्रदेश भाजपचा विश्वास नाही का..? खास. नारायण राणे, पालकमंत्री नाम.नितेश राणे जिल्ह्यात किंबहुना कोकणात भाजप पक्ष संघटना वाढविण्यात कमी पडत आहेत का..? असे अनेक प्रश्न, प्रतिक्रिया जिल्ह्यातील कितीतरी राजकीय विश्लेषकांच्या मतांमधून उमटताना ऐकू येऊ लागल्या. दुसरीकडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर राणेंकडून आपल्याला धोका आहे, असे म्हणणाऱ्या विशाल परब यांना आता जिल्हा भाजपात राणेंचे वर्चस्व असताना भाजप पक्षात काम करणे सोपे होईल का..?
“आपला प्रत्येक श्वास जनतेच्या हितासाठी असेल” अशी पहिलीच प्रतिक्रिया देणाऱ्या विशाल परब यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदारांना दिलेली आश्वासने, दोडामार्ग येथील गो शाळा, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असे अनेक प्रश्न मतदारसंघात असताना निवडणुकीत पराभूत झाल्यावर मतदारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष का केला..? निवडणुका जिंकल्या तरच हे प्रश्न ते सोडविणार होते का..? म्हणजे केवळ मतदारांचा वापर करून घेऊन नंतर त्यांना वाऱ्यावर सोडणे ही त्यांची कृती, वृत्ती योग्य होती का..? जय पराजय हे होतंच असतात पण नेत्याने पराभूत झाला तरी जनतेच्या जवळपास राहिले पाहिजे तरच त्याला भविष्यात किंमत मिळते. पण विशाल परब पराभूत होताच हे विसरले कारण त्यांना पक्के माहिती आहे की, मतदार पैशाने विकत घेता येतात, आणि विकले जातात…!
एकीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस मोठ्या धडाक्यात सुरू होता तरी दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या भाजपामध्ये मुंबईत विशाल परब यांच्या घर वापसीचा जल्लोष होत होता आणि त्याला मुहूर्त देखील संजू परब यांच्या वाढदिवसाचाच होता हे विशेष..!
विशाल परब यांनी अल्पावधीतच आपल्या विशेष योजनांच्या आधारे जनमानसात आपली एक वेगळी छबी तयार केली, युवकांची भक्कम फळी उभी केली होती. त्यामुळे ते गावागावात पोचले आहेत. तर दुसरीकडे आपल्या शांत संयमी चालींनी संजू परब यांनी मतदारसंघातील नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्राप्त करून पक्ष वाढीसाठी खस्ता खाल्ला आहे. त्यामुळे निवडणुका जिंकण्यात त्यांना माहीर मानले जाते. त्यासाठी त्यांना त्यांचे नेतृत्व आमदार निलेश राणे यांची खंबीर साथ आहेच तर शांत संयमी आणि राजकीय चाणाक्य म्हणून ओळख असणाऱ्या आमदार दीपक केसरकरांची आता त्यांना सर्वतोपरी मदत मिळणार आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात परब V/s परब असा राजकीय सामना पहायला मिळेल यात शंकाच नाही..!
पण…,
या सर्व घडामोडींमध्ये सावंतवाडी मतदारसंघातील विधानसभेच्या सारीपाटावर आडव्या तिडव्या चाली चालणारा वजीर विशाल परब यांच्या खेळाचा सूत्रधार तत्कालीन पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण होते हे मात्र सिंधुदुर्गातील अजाण जनतेच्या सुद्धा ध्यानात आले हे मात्र खरे..!
परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपामध्ये खासदार नारायण राणे यांचे वर्चस्व असलेली नवी भाजपा आणि रवींद्र चव्हाण यांच्या मर्जीतली मूळ भाजपा असे दोन गट कार्यरत राहतील का..? अशी कुजबुज दबक्या आवाजात सुरू असून लवकरच त्याचे खरे खोटे चेहरे जनतेच्या आरशात प्रतिबिंबित होतील हे ही तितकेच खरे..!

