कंत्राटी कामगारांना रोजगाराआधीच राजीनाम्याचा दबाव
भारतीय मजदूर संघाने महावितरणकडे चौकशीची मागणी केली – आनंद लाड
मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील महावितरण कंपनीच्या शेकडो सबस्टेशनमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या हजारो कंत्राटी कामगारांना रोजगार देण्याआधीच त्यांच्याकडून जबरदस्तीने राजीनाम्याची, स्टॅम्पवर हमीपत्रांची व विशिष्ट राजकीय संघटनेचे सभासदत्व स्वीकारण्याची लेखी हमी घेतली जात असल्याचा गंभीर आरोप भारतीय मजदूर संघाच्या संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केला आहे.
महावितरणच्या कंत्राटी कामासाठी “स्मार्ट सर्विसेस” व “क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस” या दोन कंपन्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापैकी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनी कामगारांना रोजगार देण्यापूर्वीच जबरदस्तीने 100 रुपयांच्या स्टॅम्पवर राजीनाम्याचे व हमीपत्र लिहून घेत आहे, तसेच विशिष्ट राजकीय संघटनेचे सदस्यत्व घेतल्याशिवाय कामावर घेतले जात नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय काही प्रकरणांमध्ये कामगारांच्या खात्यातून न बोलता काही रक्कम कपात केल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून या पूर्वीच कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना प्राधान्याने रोजगार मिळावा, असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) मा. राजेंद्रजी पवार यांना या संदर्भात आधीच पत्र देऊन बैठक घेण्याची विनंती करण्यात आली असून, लवकरच चर्चा होईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष खरात यांनी दिली.
“सर्व एजन्सींना संघटनेकडून सकारात्मक सहकार्य दिले जाईल, मात्र कोणीही कामगार कायद्याचे उल्लंघन करू नये,” असा इशारा संघटनेचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.
या अन्यायाविरोधात संघटना आपल्या सदस्यांसोबत उभी असून, संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून कामगारांच्या हक्कांचे रक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

