वाहतूक नियंत्रणासह कुडाळमध्ये तयारीला सुरुवात
कुडाळ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकऱ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत वाहतूक व्यवस्था, पार्किंग, फेरीवाल्यांची ठरावीक जागा, तसेच शहरातील आवश्यक सोयीसुविधा आणि नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. वाहतूककोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या असून, एसटी महामंडळालाही वन-वे मार्ग वापरण्याचे सूचनाही देण्यात आले.
या बैठकीला मुख्याधिकारी अरविंद नातू, गटनेते विलास कुडाळकर, तसेच अनेक नगरसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात अनावश्यक वाहतूक होऊ नये, यासाठी कडक निर्देश दिले गेले. चतुर्थीच्या दिवसांत केवळ गणेशोत्सवाशी संबंधित मातीच्या साहित्याची विक्री करण्यासच परवानगी देण्यात आली आहे.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकऱ यांनी स्वच्छता आणि वीजपुरवठा याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व नागरिकांनी हा उत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
