कुडाळ :
कुडाळ पंचायत समितीच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रानभाजी पाककला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली. या संदर्भात पंचायत समितीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
हा महोत्सव पंचायत समितीच्या अल्पबचत सभागृहात होणार असून, कोकणातील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी फायदे आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध पाककृतींची माहिती देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजच्या आहारात रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे अनेक भाज्यांचे पोषक मूल्य घटले आहे, मात्र रानभाज्या पूर्णपणे नैसर्गिक व शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्पर्धेचे स्वरूप व नियम
स्पर्धा वैयक्तिक पातळीवर होणार असून कुडाळ तालुक्यातील बचत गटातील सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होऊ शकतात. सहभागी स्पर्धकांनी दिलेल्या रानभाज्यांपासून पदार्थ तयार करून त्यासोबत मूळ नमुना, लिखित पाककृती, सजावट व स्वच्छतेसह मांडणी करणे आवश्यक आहे. पदार्थाच्या चव, पौष्टिक मूल्य, मांडणी आणि स्वच्छतेवर आधारित गुणांकन केले जाईल.
स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होणार असून उशिरा येणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही. गुणांकनानुसार प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ३ स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पंचायत समिती कुडाळ येथील कृषी विभागात नोंदवावीत.
महिला व अंगणवाडी सेविकांचा सहभाग
या महोत्सवात महाराष्ट्र राज्य जीवनज्योती अभियानाच्या बचत गटातील महिला, एकूण ९ भागातून प्रत्येकी ३ महिला अशा २७ महिला सहभागी होणार आहेत. तसेच ८ बिटमधील प्रत्येक बिटमधून २ अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस सहभागी होतील. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी देखील स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
संपर्कासाठी
अधिक माहिती व नोंदणीसाठी श्रीमती सोनिया पालव, विस्तार अधिकारी (कृषि) – 📞 ९४०४४३९५७५ किंवा संदेश परब, विस्तार अधिकारी (कृषि) – 📞 ९४२३८८१६६६ यांच्याशी संपर्क साधावा.
गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा व महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

