दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्ती पकड मोहिमेसाठी तातडीने बैठक घेण्याची आमदार दीपक केसरकर यांची मागणी
दोडामार्ग
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक वसंतराव केसरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री मा. ना. श्री. गणेशजी नाईक यांना एक निवेदन पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तीच्या वाढत्या उपद्रवावर उपाययोजना करण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी केली आहे.
केसरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डोडामार्ग तालुक्यात कर्नाटकच्या धर्तीवर रानटी हत्ती पकड मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वनविभागाने सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्याकडे सादर केला आहे.
हा प्रस्ताव विचाराधीन घेऊन तत्काळ निर्णय घेण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीस गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आवाहन आमदार केसरकर यांनी केले आहे. तसेच, स्थानिक आमदार म्हणून त्यांना बैठकीस आमंत्रित करण्यात यावे, अशी नम्र विनंतीही त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
