फोंडाघाटमध्ये ओव्हरलोड ट्रक रस्त्यावर बंद;
वाहतूक ठप्प, आर.टी.ओ.च्या दुर्लक्षावर अजित नाडकर्णींचा सवाल
फोंडाघाट
फोंडाघाट घाटात ओव्हरलोड ट्रक नादुरुस्त होऊन रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने जवळपास ३० तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज महसूल मंत्री सिंधुदुर्गमध्ये असताना, पैसे घेऊन बेकायदेशीर पास देणं आणि आर.टी.ओ.च्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केला.
नाडकर्णी यांनी तात्काळ तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी घटनास्थळी येऊन सर्व तपासणी केली आणि पोलीस आऊट पोस्टला हेवी व्हेईकल संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली.
या संदर्भात नाडकर्णी म्हणाले, “पास देताना त्यावर किती टन चिरे भरले जात आहेत, हे नमूद करणं गरजेचं आहे. अपघात झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.”
या गंभीर विषयाकडे मंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वारंवार अशा घटना घडत असून, आर.टी.ओ. अधिकारी याकडे लक्ष देतील का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.
