You are currently viewing “AI वरदान, पण नोकऱ्यांना धोका” – डॉ. साळुंखे यांचे स्पष्ट मत

“AI वरदान, पण नोकऱ्यांना धोका” – डॉ. साळुंखे यांचे स्पष्ट मत

पंचम खेमराज महाविद्यालयात ‘संस्थापक दिन ‘साजरा

सावंतवाडी :

कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यामध्ये माणसासाठी वरदान ठरणारी आहे, परंतु यामुळे अनेक नोकऱ्या जाण्याचाही धोका संभवू शकतो. टीसीएस सारख्या कंपनीने आपले बारा हजार कर्मचारी कमी केले हे त्याचेच उदाहरण आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाला पर्याय ठरू शकत नाही. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने इंटरनेटवर असलेला डेटा याचे एनालिसिस करून त्याप्रमाणे माहिती देण्याचं काम ती करत असली तरी मानवी भावभावना, प्रज्ञा, आदर्श, संस्कार यांची जागा ते घेऊ शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नवनिर्मिती करू शकत नाही. त्यासाठी प्रज्ञावंत माणसांचीच गरज आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी सावंतवाडी येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे बुधवार १३ ऑगस्ट २०२५ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल, हीज हायनेस, राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांची ९८ वी जयंती ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरी करण्यात आली यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, सौ कमल साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, संस्थानप्रेमी नागरीक, सामाजिक कार्यकर्ते श्री अण्णा केसरकर, ॲड.नकुल पार्सेकर, प्रा अन्वर खान,श्री मंगेश तळवणेकर, ॲड. संदीप निंबाळकर, श्री यशवंत देसाई, श्री भरत नार्वेकर, लॉ कॉलेजच्या प्राचार्या सौ अश्विनी वेंगुर्लेकर, मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अनुजा साळगावकर, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ स्मिता सुरवसे, सौ.रमा सावंत, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शारीरिक कमतरतेवर मात करीत बीकॉम परीक्षेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या कु.चैताली प्रसाद तेंडुलकर, तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी कु. शाहीन रिजवान करोल हिने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच २०२४-२५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या सीनियर नॅशनल कॅरम चॅम्पियन स्पर्धेमध्ये टी वाय बी कॉम ची विद्यार्थिनी कु. केशर राजन निर्गुण हिने द्वितीय क्रमांक पटकावला या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे माजी कर्मचारी श्री मोरेश्वर पोतनीस यांनी राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांच्या जीवनावरील भावनिक काव्य सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागाच्या प्राध्यापिका सौ पूनम सावंत यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. यू सी पाटील यांनी तर आभार वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ यु आर पवार यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा