You are currently viewing गोविंद गावडेचा तबलावादन जागतिक विक्रम

गोविंद गावडेचा तबलावादन जागतिक विक्रम

दिनेश गावडे यांचे विशेष गौरवोद्गार; ‘शिव-तांडव’ वादन आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्डमध्ये नोंदवून आंबोलीचे नाव उज्ज्वल

 

सावंतवाडी : आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील कु. गोविंद बाबुराव गावडे या तरुणाने तबलावादनात इतिहास घडवत आंबोलीचे नाव जगभर पोहोचवले. आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्ड (२७७ देश) मध्ये सलग ८ तास २५ मिनिटांचे ‘शिव-तांडव स्तोत्र’वर तबला वादन करून नवीन विक्रम त्याने आपल्या नावावर नोंदवला. या त्यांच्या यशाबद्दल आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी अभिनंदन केले आहे.

आंबोलीतील गड्डुवाडी येथे जन्मलेला गोविंद सध्या शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये असून वडील मेनेन अँड मेनन कंपनीत कार्यरत आहेत. आई-वडिलांच्या अथक पाठिंब्याने, डॉक्टर कदम सरांच्या मार्गदर्शनाने आणि श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा विक्रम शक्य झाला.

विक्रमासाठीची तयारी आदल्या दिवशीच पूर्ण झाली होती. बॅनर लावणे, कॅमेरा सेटिंग, आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्ड संस्थेशी संपर्क अशा सर्व व्यवस्था करून सकाळी नेमके आठ वाजता शिक्षण महर्षी डॉक्टर साळुंखे सांस्कृतिक भवन येथे वादनास सुरुवात झाली. श्रावणी सोमवारी झालेल्या या वादनावेळी गोविंदच्या चेहऱ्यावर तणावाची छटा नव्हती, उलट अजून दोन-तीन तास निवांत वादन करण्याची ऊर्जा त्याच्यात होती. मात्र, संस्थेकडून दिलेल्या पूर्वपरवानगीच्या वेळेमुळे कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच संपवावा लागला.

गोविंदच्या या यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोकणच्या लाल मातीला कोल्हापूरच्या काळ्या मातीने दिलेली ही ओळख स्थानिकांसाठी अभिमानाची बाब आहे. कोल्हापूरवासीयांनी दिलेल्या भरभरून कौतुकाने आणि शुभेच्छांनी गोविंद अधिक प्रेरित झाला आहे.

आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी या कामगिरीबद्दल गोविंदचे विशेष अभिनंदन करून आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा