सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलावाला सुवर्णनारळ ‘ अर्पण
दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी
सावंतवाडी
दरवर्षीप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडी येथील संस्थानकालीन ऐतिहासिक मोती तलावात नारळ अर्पण करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो सावंतवाडीकर नागरिक या सोहळ्यासाठी एकत्र जमले होते, ज्यामुळे तलावाकाठी एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या ‘सुवर्ण नारळा ‘ची पूजा करण्यात आली. या पूजनानंतर हा सुवर्ण नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला.
तत्पूर्वी, सावंतवाडी पोलिसांनी मानाच्या श्रीफळाची मिरवणूक काढली. ही मिरवणूक वाजतगाजत मोती तलावाच्या काठावर पोहोचल्यावर मिरवणुकीतील आणि संस्थानच्या मानाच्या नारळांची पूजा केली गेली. राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी विधिवत पूजा आणि आरती केली.
त्यानंतर, सोन्याचा नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित असलेल्या सर्व सावंतवाडीकरांनी आपापले नारळ तलावात अर्पण केले. या खास क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोती तलावाभोवती मोठी गर्दी जमली होती.
या सोहळ्याला सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, मोरेश्वर पोतनीस, सुंदर गावडे, शैलेश मेस्त्री, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस, सहायक पोलिस निरीक्षक श्री. खंदरकर, पोलिस हवालदार महेश जाधव, अमित राऊळ, पुंडलिक सावंत, पोलिस कॉन्स्टेबल श्री. कोरगावकर, महिला पोलिस हवालदार श्रीम पवार, पोलिस हवालदार श्री.राऊत, राजा राणे, श्री. गवस, सचिन कुलकर्णी, भटजी श्री. सोमण यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


