You are currently viewing *काय सांगता ? पुणे शहर ठरले थंड हवेचे ठिकाणी.*

*काय सांगता ? पुणे शहर ठरले थंड हवेचे ठिकाणी.*

पुणे : राज्यात पुणे हे सर्वांत थंड शहर असल्याची नोंद गुरुवारी हवामान खात्यात झाली. पुण्यातील शिवाजीनगर येथे किमान तापमानाचा पारा १०. ३ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा कायम राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला.

 

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेतील किमान तापमानाचा पारा सातत्याने कमी होत आहे. चाळीस दिवसांमधील सर्वांत नीचांकी किमान तापमान (१०. ७ अंश सेल्सिअस) बुधवारी शहरात नोंदले गेले. त्यानंतर गुरुवारी सकाळपर्यंत किमान तापमानाचा पारा आणखी घसरून १०. ३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. पुण्यातील शिवाजीनगर येथे किमान तापमान सरासरीपेक्षा १. ३ अंश सेल्सिअसने घसरले.

पुण्यात पुढील दोन दिवस हवेतील गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान १० ते ११ सेल्सिअसपर्यंत राहील. त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता. ५) सकाळी धुके पडण्याची शक्यता असून, आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर, शनिवारी (ता. ६) किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. त्यानंतर आकाश निरभ्र राहणार असल्याने पुढील दोन दिवस हवेतील गारठा आणखी वाढेल, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

 

राज्यात थंड वारे

राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. कोकणातील काही भागांत थंडी कमी असली, तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडीत वाढ झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस ही थंडी कमी-अधिक स्वरूपाची राहील. अफगाणिस्तानचा पूर्व भाग आणि पाकिस्तानच्या उत्तर परिसरात चक्रीय स्थिती आहे. राजस्थानच्या वायव्य व परिसरात चक्रीय स्थिती असल्याने पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे उत्तर भारतातील काही भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच उत्तर केरळची किनारपट्टी ते दक्षिण गुजरात या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे कोकणातील काही भागातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा