बापलेक
बाप नसेन मी तुझा खरा,
माया बापाचीच करतो.
तुझ्या एका सुखासाठी मी,
तारा बनून तुटत राहतो.
तुझ्या ओठीचे हास्य,
उमलत्या कळीसारखं फुलतं.
सुखात तुला पाहताच,
मन माझं आनंदे डुलतं.
खळखळून हसताना तू,
अंतरंगातील भाव मांडतेस.
नेत्र कमलातून तुझ्या तू,
आनंदाने मोती सांडतेस.
हृदयातील भावना तुझ्या,
माझ्या मनाला कळतात.
अव्यक्त तुझे शब्द मला,
नकळत दिस-रात छळतात.
आशीर्वादाचा हात सदा,
तुझ्याच कपाळी असतो.
तुला दिसो न दिसो तो,
पोरीसाठी कधीही उठतो.
एकच प्रार्थना चरणी ईश्वरा,
सर्व सुख तुला जीवनी मिळो.
बापाचा जीव तुटणे, लुटणे,
तुला एकाक्षणी कधीतरी कळो.
(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६