विशेष संपादकीय…
सिंधुदुर्ग जिल्हा अतिशय शांत आणि निसर्गसौंदर्य लाभलेला महाराष्ट्रातील छोटासा जिल्हा. एकापेक्षा एक बुद्धिवंत नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारण दिले. बॅरिस्टर नाथ पै पासून मधु दंडवते सारखे लोकांसाठी तळमळीने काम करणारे नेतृत्व जिल्ह्याने पाहिले. परंतु जिल्ह्याचा म्हणावा तसा पायाभूत विकास झाला नव्हता. कोकण रेल्वेचे स्वप्न मधू दंडवतेंनी पूर्ण केले, परंतु गावागावात वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधापासून जिल्हा मात्र वंचित होता.
याच काळात मुंबई येथून नारायण राणेंसारखे तरुण तडफदार नेतृत्व शिवसेनेने जिल्ह्यात पाठविले. सुरुवातीच्या काळात नारायण राणे यांच्यावर खुनासारखे आरोप झाले. परंतु त्यातूनही बाहेर पडत नारायण राणे यांनी जिल्ह्यात शिवसेना वाढविली, आणि थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली. राणेंच्या राजकीय कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते, पाणी, विजेच्या अनेक समस्या मार्गी लागल्या. आणि जिल्ह्यात राणे पर्वाला सुरुवात झाली. राणेंनी खऱ्या अर्थाने जिल्ह्यात विकासाची गंगा आणली आणि जिल्ह्याचे नाव राणेंमुळे राज्यात, देशात सर्वदूर गेले.
नारायण राणे यांनी जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज आणले, त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो विध्यार्थ्यांना जिल्ह्यातच इंजिनिअरिंगचे शिक्षण मिळण्याची सुविधा निर्माण झाली. जिल्ह्यात अद्ययावत रुग्णालयाची गरज असताना राणेंनी अथक प्रयत्नांनी सर्व सोयींनी युक्त असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय ओरोस जवळ पडवे या गावी सुरू केले. त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासाठी गोवा, कोल्हापूर येथे धाव घ्यावी लागत होती ती परवड थांबली. राणेंनी सुरू केलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज,मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, असो वा शोरूम असो जिल्ह्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. नारायण राणे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी आपल्या रुग्णालयात गोरगरिबांना सुविधा मिळाव्यात यासाठी मेडिकल कॉलेजची मंजुरी घेतली. येत्या ६ फेब्रुवारीला नारायण राणे यांच्या याच मेडिकल कॉलेजचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उद्धाटनला अमित शहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालयास मेडिकल कॉलेज संलग्न झाल्यामुळे अनेकांना सवलतीच्या दरात उपचार मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे गोरगरिबांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही.
नारायण राणे यांचे जिल्ह्यात आगमन झाले त्यावेळी त्यांची वेगळी ओळख होती. परंतु आपल्या कार्यपद्धतीने आणि विकासात्मक धोरणांनी त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं, जवळपास पाव शतक त्यांनी एकहाती जिल्ह्यावर सत्ता केली आणि आजही त्यांनी जिल्ह्यावर आपली मजबूत पकड राखली आहे. जिल्ह्यात पंचायत समिती पासून जिल्हा परिषदवर त्यांचीच सत्ता आहे. कार्यकर्त्यांना योग्य सन्मान दिल्यामुळे लोक सुद्धा त्यांच्या मागे आहेत.
लोकांच्या मनाचा ठाव जाणणारे लोकनेते नारायण राणे यांच्या स्वप्नवत मेडिकल कॉलेजचे उद्घाटन ६ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत असल्याने केंद्रातही त्यांच्या शब्दाला वजन असल्याचे संपूर्ण जिल्ह्याला दिसून येणार आहे.