You are currently viewing *ठाण्यातील तीन रस्ते ” मॉर्निंग वॉक “साठी आरक्षित*

*ठाण्यातील तीन रस्ते ” मॉर्निंग वॉक “साठी आरक्षित*

ठाणे महापालिका स्वच्छ आणि सुंदर शहराचा नारा देत असतानाच ठाणेकरांचे आरोग्य सदृढ राहवे यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘मॉर्निंग वॉकर्स’साठी सकाळी पाच ते सात या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या अभिनव योजनेमुळे ठाणेकरांना मॉर्निग वॉक करण्यास प्रोत्साहन मिळेल, सुरक्षितपणे व्यायामाची संधी मिळेल आणि सकाळच्या वेळात होणार्‍या सोनसाखळी चोऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.

रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्ग ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे अभियान हाती घेतले आहे. परंतु, त्यातून केवळ वाहनचालकांसाठीच नव्हे, तर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीसुद्धा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यानुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही योजना मूर्त स्वरूप घेत आहे. केवळ मॉर्निग वॉकसाठी काही रस्ते आरक्षित असावे यासाठी सहपोलिस आयुक्त श्री. सुरेश मेखला आग्रही होते. त्यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील तीन हात नाका (उपायुक्त कार्यालय) ते धर्मवीर नाका सर्व्हिस रोड, उपवन तलावाजवळील अँम्फी थिएटर ते गावंड बाग (गणपती विसर्जनाचा कृत्रिम तलाव), पोखरण रोड क्रमांक दोन येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौक या तीन रस्त्यांची निवड या विशेष योजनेसाठी करण्यात आली आहे. सकाळी पाच ते सात या वेळात या तिन्ही रस्त्यांवर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या रस्त्यांवर केवळ मॉर्निग वॉकर्स, जॉगर्स, योगा किंवा अन्य प्रकारांचे व्यायाम करणारे तसेच, सायकलिंग करणा-यांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

मॉर्निग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरण्याचे प्रकार होतात. त्यांना रोखण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. मात्र, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून वॉक करणे महिलांना थोडे असुरक्षित वाटते. परंतु, आता या तीन रस्त्यांवर सकाळी कोणत्याही वाहनांना प्रवेश मिळणार नसल्याने महिलांसह प्रत्येक पादचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच, वॉक करताना या रस्त्यांवर अपघात होण्याचा धोकाही नसेल. या उपक्रमामुळे मॉर्निग वॉक करणा-यांच्या संख्येत निश्चित भर पडेल असा विश्वास बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, ठाणेकरांना पहाटे उठून व्यायाम करण्याची सवय लागावी, यासाठी वाहतुकीचे निर्बंध ५ ते ७ पर्यंतच ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्मार्ट आणि आरोग्यदायी शहरासाठी

मॉर्निंग वॉकचे अनेक फायदे आहेत. चालण्याने श्वासाची गती, हृदयाची गती तसेच रक्त प्रवाहावर चांगला परिणाम होतो. पचनशक्ती वाढून भूक वाढण्यास मदत होते. शरीर तंदुरुस्त राहते. त्यामुळे मॉर्निग वॉकला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे. – बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा

प्रतिक्रिया व्यक्त करा