*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम लेख*
*पंचमीचे गारूड…*
वयाची सत्तरी ओलांडली तरी नागपंचमीचे गारुड काही मनातून जात नाही! आषाढ अमावस्या झाली की श्रावणाचे वेध लागतात आणि पहिला सण येतो तो नागपंचमी! लहानपणी कोकणात राहत असल्याने नागपंचमीची मजा काही वेगळीच होती! पाऊस भरपूर असे, त्यामुळे देशावर जसे नागोबाला पुजायला शेतावर किंवा गावाबाहेर एखाद्या वारुळाजवळ सगळ्या सख्या जाऊन वारुळाची पूजा करणे, झोके बांधणे , झोके खेळणे या गोष्टी करतात त्या कोकणात नव्हत्या… आमच्या घरी आई पाटावर चंदनाने नाग- नागिण, तिची पिल्ले काढत असे आणि हळदीकुंकू, फुले वाहून लाह्या, दूध याचा नैवेद्य दाखवत असे.
जेवणात तांदळाच्या रव्याची खांडवी किंवा उकडीचा मोदक असे. त्यातून हा सण एखाद्या मंगळवारी आला तर मंगळागौरीचा वेगळा थाट असे!
पुढे देशावर आल्यावर नागपंचमीची वेगळी मजा अनुभवायला मिळाली. गावाबाहेर झाडांना मोठमोठे झोके बांधलेले असत, तसेच गावातही विविध संस्था मोठे मोठे झोके बांधून झोक्यावरचे खेळ घेत असत. मुलीबाळी, स्त्रिया व इतर मुले झोके खेळण्यासाठी येत. नागोबाची पूजा करून त्याला नैवेद्य होत असे. कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डर वरील आमच्या सांगली मिरजेकडे चवथीचा भाजका उपास असे. त्या दिवशी भावाची (नागाची) बहीण म्हणून स्त्रिया डाळ- तांदळाची खिचडी किंवा भाजणीचे थालीपीठ किंवा ओल्या नारळाची करंजी असा जेवणासाठी भाजक्या उपासाचा बेत करत असत. संध्याकाळी मुली फेर धरत, झोके घेत, वेगवेगळी गाणी म्हणत.. या सणाला माहेरवाशीणी हमखास माहेरी येत असत!”चल ग सये वारुळाला, नागोबाला पुजायला!” अशी गाणी नागासाठी म्हणजे भाऊरायासाठी म्हणत. तो एक आनंद उत्सव असे. बऱ्याच जुन्या मराठी सिनेमांमध्ये आशा काळे, जयश्री गडकर, सुलोचना यासारख्या नट्यांनी या नागपूजन, वडपौर्णिमा यासारख्या उत्सवांचा आनंद आपल्या डोळ्यांना दिला आहे!
घरोघरी मातीच्या बनवलेल्या नागांची पूजा केली जात असे नागांच्या जोड्या बाहेर जरी विकत मिळत असल्या तरी माझा मुलगा, केदार नागांची छान जोडी बनवत असे. चार दिवस आधी हे नाग बनवून ठेवायचे, त्याला जोंधळ्याचे डोळे लावायचे हे त्याचं वैशिष्ट्य! नागपंचमीच्या दिवशी त्या नागाची वस्त्र, लाह्या, फुलं वाहून पूजा करायची. नागाला दुधाचा नैवेद्य दाखवायचा या गोष्टी आवर्जून करत होतो .
हा सण मुलींचा असल्याने मुलींना बांगड्या भरणे, नवीन परकर पोलका शिवणे होत असे. माहेरवाशीणीला बांगड्या, साडी, सौभाग्यालंकार देऊन तिची बोळवण करणे आवर्जून होत असे.
मी सांगलीच्या होस्टेलवर 1971 ते 73 पर्यंत राहत होते.
सांगली जवळ बत्तीस शिराळा येथे नागाचा मोठा उत्सव पारंपारिक पद्धतीने होतो. घरोघरी नागाची पूजा तर होतेच, पण संध्याकाळी नागांची मिरवणुक ही होत असे.
गावाबाहेरच एका ठिकाणी जत्रा असे. तिथे नागांचे प्रदर्शनच असे. सर्व प्रकारचे सरपटणारे प्राणी तिथे बघायला मिळत. विषारी, बिनविषारी साप, धामीण, अगदी अजगर सुद्धा तिथे बघायला मिळे. फोटोग्राफर गळ्यात साप घालायला देऊन फोटो काढत असत. अशी ही जत्रा बघायची खूप इच्छा तेव्हा होती. आम्हाला हॉस्टेल वरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी रेक्टर मॅडमची परवानगी घ्यावी लागत असे. पण एक वर्ष आम्ही हॉस्टेल वरून सांगली शहरात जातो असे सांगून ४/५ जणी थेट बत्तीस शिराळ्याला गेलो. तेथील एक मुलगी आमच्या होस्टेलवर राहणारी होती. तिच्या घरी गेलो.
तिच्याकडे खाणे पिणे करून दुपारभर जत्रेत हिंडलो! नाग सापांचा सगळीकडे सुळसुळाट दिसत होता. मनातून भीती वाटत होती, पण मज्जा म्हणून सगळं बघत होतो. आम्ही मैत्रिणींनी ही धिटाई दाखवत साप गळ्यात घालून फोटो काढून घेतले. एका तासात फोटोची कॉपी मिळाली.
त्यामुळे एक संस्मरणीय आठवण आमच्याकडे राहिली होती.
दुपारी चार वाजता बैलगाड्यांवरून नागांची मिरवणूक निघत असे. ती थोडीशी पाहून मिळेल त्या बसने सांगलीला हॉस्टेलवर परत आलो. सातच्या आत घरात! तरीही मॅडमना कळायचे ते कळलेच, मग थोडी आमची खरडपट्टी! पण तेव्हा जो आनंद मिळाला होता तो पुन्हा मिळणार नव्हता, त्यामुळे सगळा ओरडा मुकाट्याने गिळून टाकला आणि पुढील दिवसाला सामोरे गेलो.
आज इतक्या वर्षानंतरही नागपंचमीचा तो दिवस स्मरणात आहे लग्नानंतर सांगली भागात इतकी वर्ष राहिले पण नागपंचमीला बत्तीस शिराळ्याला जाण्याचा योग आला नाही. तरीही सांगलीत असताना सर्वांच्या बरोबर मेहंदी काढणे, बांगड्या भरणे, नवीन कपडे शिवणे हे उत्साहाने होत होते च!
देशावरील नागपंचमी खरोखरच उत्साहात आहे असे!
पुन्हा एकदा मनाशी हिंदू संस्कृती आठवते ती याच कारणाने की, आपला प्रत्येक सण निसर्गाला, प्राण्यांना धरून आहे! वडपौर्णिमा असो की बैलपोळा असो, नागपंचमी असो की नारळी पौर्णिमा, आपण निसर्गाप्रती कृतज्ञ असतो! ज्या पंच महाभूतांच्या सहाय्याने निसर्गात आपला जीवनक्रम चालू असतो त्या निसर्गाबद्दल आपुलकी, प्रेम, कृतज्ञता असावी हेच खरे!
ही भावना आधुनिकतेच्या नावाखाली काही प्रमाणात कमी झालेली आहे असे वाटते. गावाकडचे सण काहींना गावंढळ वाटतात, पण तसं नाही. शेतकरी जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्याचे शेत हा त्याचा अनमोल ठेवा आहे. त्याच्याशी जोडलेली कृषी संस्कृती ही शेतकऱ्याचा सन्मान करणारी आहे आणि आपल्या कृषिप्रधान भारतात त्या त्या संस्कृती प्रमाणे, काळाप्रमाणे आणि स्थानाप्रमाणे असे सण साजरे केले जातात हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, असे मला मनापासून वाटते! विशेष म्हणजे मी यंदा दुबई ला लेकी कडे आहे.आणि ती आता माझे माहेरपण करत आहे हेही माझे भाग्य च!जवळपास 50/ 52 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आता राहिला नसला तरी, संस्कृती आणि सुधारणा यांची सांगड घातली तर आपण चांगल्या प्रतीचे जीवन जगू शकतो हे मात्र निश्चितच!
उज्वला सहस्रबुध्दे,पुणे

