You are currently viewing नद्यांमधील गाळ उपसण्याच्या कामात दिरंगाई नको

नद्यांमधील गाळ उपसण्याच्या कामात दिरंगाई नको

प्राधान्यक्रमाने पाच ठिकाणी निश्चित करा – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या गावांचा अभ्यास करा. गाळ काढायच्या नद्या व ठिकाणे प्रथम निश्चित करा. प्रथम प्राधान्यक्रम असलेली पाहिली पाच ठिकाणे ठरवा. व त्या ठिकाणच्या नद्यांमधील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरू करा. कोणाच्या खिशात पैसा टाकण्यासाठी ही कामे करू नका तर यापुढे जनतेसाठी काम करा असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी, ओढे, नाले मधील गाळ काढण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, कुडाळ तालुक्यातील भंगसाळ, पीठढवळ, बेल नदी तर कणकवली तालुक्यातील गड नदी या नद्या गाळाने पूर्णपणे भरल्याने त्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे या नद्यांच्या जवळ वसलेल्या लोकसंख्योला पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या नद्यांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. या नद्यांप्रमाणेच जिल्हा प्रशासनाने अन्य नद्यांचे सर्वेक्षण करुन कोणत्या नद्यांमध्ये गाळ साचलेला आहे त्याची माहिती घ्यावी. तसेच हा गाळ काढण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे त्याचे अंदाजपत्रक तयार करावे. गाळ काढण्यासाठी जिल्हा नियेाजन समितीच्या निधीमधून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. गाळ काढण्याच्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन पहिल्या टप्प्यात ५ ठिकाणांवर गाळ काढण्याचे काम सुरू करावे ते काम संपताच पुढील ५ ठिकाणांवरील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

या जिल्ह्यात अनेक गावे पूर परिस्थितीमुळे बाधित झाली आहेत. पुरामध्ये काय गावातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले होते. ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी नद्यांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. जो उपलब्ध निधी आहे त्यातून प्रथम प्राधान्यक्रमाची ठिकाणी ठरवा. व त्या ठिकाणच्या गाळ मोकळा करा. अशा ठिकाणांची यादी आजच निश्चित करा व २४ जानेवारी रोजी आपल्या समोरील बैठकीत सादर करा. आपण त्याला मंजुरी देऊ. व आणखीही निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत दिली. जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरू आहेत, अनेक रस्त्यांची कामे ही सुरू आहेत. जर या कामाला नद्यांमधील गाळ आवश्यक असेल तर त्याबाबतची ही योजना तयार करा. असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना या बैठकीत दिले.

नद्यांमधील उपसण्यासाठी किंवा एखाद्या ठेकेदाराला काम देण्यासाठी ही कामे नकोत, तर तो गाळ काढल्यानंतर पुराचे पाणी त्या गावात घुसू नये व केलेल्या कामाचा जनतेसाठी उपयोग व्हावा याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. जबाबदाऱ्याने हे काम करावे अन्यथा आपल्याला दखल घ्यावी लागेल असेही नितेश राणे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा