सिंधुदुर्गातील १५० भजनी मंडळांना गणेशोत्सवापूर्वी १२ ते १५ हजारांचे अनुदान मिळणार
भजन साहित्याऐवजी अनुदान देण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांना यावर्षीपासून भजन साहित्याऐवजी त्याच्या खरेदीसाठी किंवा दुरुस्तीसाठी थेट आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली. कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेमार्फत मंडळांना भजन साहित्य देण्यात आले होते. मात्र साहित्याचा दर्जा समाधानकारक नसल्यामुळे योजनेत बदल करत अनुदान स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या पुढाकारातून साकारली गेली आहे.
यंदा गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील १५० भजनी मंडळांना प्रत्येकी १२ ते १५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान मंडळांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल.
सदर योजना नवीन असल्याने इच्छुक भजनी मंडळांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून अर्ज ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होतील. प्राप्त अर्जांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड होणार आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजारांहून अधिक भजनी मंडळे असून, त्यांना जिल्हा बँकेत खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
भजनी कलाकार संस्थेचे सचिव गोपी लाड आणि खजिनदार मयुर ठाकूर हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनुदान वितरणाचा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाणार असल्याचेही अध्यक्ष संतोष कानडे यांनी यावेळी सांगितले.
