You are currently viewing सया जमता अंगणी !!

सया जमता अंगणी !!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सया जमता अंगणी !!*

 

आला श्रावण महिना

लेक आली माहेराला

मेळा जमे अंगणात

सया आल्या खेळायला ||

 

नागपंचमीचा सण

झोका झाडाला बांधला

खेळ रंगला सख्यांचा

स्वर आभाळी पोचला ||

 

किती चालतो हा दंगा

जणू चिमण्या जमल्या

मुक्तपणे बागडणे

सारा ताण विसरल्या ||

 

हास्य विनोदाने त्यांच्या

बालपण परतले

आता लेकीला पाहून

डोळे आईचे भरले ||

 

बाईपण निभावता

जाते माहेर बाजूला

माहेराच्या अंगणात

ठेवी सासर बाजूला

 

माहेरच्या आठवणी

त्यांच्या आनंदाचा ठेवा

संसारात रमताना

सदा सुखी ठेवी देवा ||

 

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा