You are currently viewing *World cancer day ; कर्करोगाचे उपचारांमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर काय होणार परिणाम ? तज्ञांचे मत !!!!*

*World cancer day ; कर्करोगाचे उपचारांमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर काय होणार परिणाम ? तज्ञांचे मत !!!!*

 

कर्करोगाच्या शस्त्रक्रिया वा उपचारांमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचे परिणाम तात्पुरते वा कायमस्वरूपी असू शकतात. महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या प्रजननासंबंधी समस्या वाढत आहेत. त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला प्रजनन क्षमता तपासणी सल्लागार डॉ. स्नेहा साठे यांनी दिला.

 

कर्करोगाच्या उपचाराने प्रजननास हानी पोहोचण्याचा धोका हे रुग्णांचे वय, कर्करोगाचा प्रकार आणि टप्पा तसेच कर्करोगाच्या उपचारपद्धतीवर अवलंबून असते. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अंडकोष (ऑर्किडेक्‍टॉमी), गर्भाशय (हिस्टरेक्‍टॉमी) वा अंडाशय (ओओफोरक्‍टॉमी) काढून टाकल्यास भविष्यातील प्रजननक्षमतेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.

तसेच ओटीपोटात वा ओटीपोटाजवळील भागांत कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे गर्भधारणेस व्यत्यय येऊ शकतात. किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आदी उपचार पद्धतीमुळेही स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक क्षमता बिघडण्याची, प्रजननक्षमता अनियमित होण्याची शक्‍यता असते, असे डॉ. साठे म्हणाल्या.

 

प्रजननक्षमतेवर होणारा केमोथेरपीचा प्रभाव हा औषध आणि त्याच्या मात्रेवर अवलंबून असतो. अल्किलेटिंग एजंट्‌स आणि ड्रग सिस्प्लाटिन हे जास्तीत जास्त नुकसान करतात. ज्या स्त्रियांना जास्त प्रमाणात मात्रा, केमो उपचार आणि किरणोत्सर्ग आवश्‍यक असतात त्यांना प्रजनन क्षमतेला कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

किरणोत्सर्गामुळे होणारे नुकसान शरीरात ज्या ठिकाणी किरणोत्सर्ग करायचा आहे, त्याचा आकार आणि दिलेल्या मात्रेवर अवलंबून असते. जास्त प्रमाणात किरणोत्सर्ग अंडाशयातील अनेक वा सर्वच अंडी नष्ट करू शकते. त्यामुळे लवकर वंध्यत्व वा रजोनिवृत्ती येते. गर्भाशयाच्या किरणोत्सर्गाच्या नुकसानीमुळे गर्भपात होणे, मुदतीपूर्वी जन्माची आणि कमी वजनाच्या बाळांची जोखीम वाढू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा