समर्थांचे विचारधन आनंद जोगळेकरांनी केले शब्दबद्ध-
डॉ.विजय लाड
वैभववाडी
समर्थ रामदास स्वामींनी अनेक विषयांवर ४५ हजार पेक्षा जास्त ओव्यांची काव्य संपदा निर्माण केली असून समर्थ रामदासांचे हे विचारधन आनंद जोगळेकर यांनी त्यांच्या लेखणीतून शब्दबद्ध केले असे प्रतिपादन ज्येष्ठ समर्थ भक्त आणि दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे संचालक डॉ. विजय लाड यांनी केले. आनंद जोगळेकर यांच्या “श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन” या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात डॉ. लाड बोलत होते.
समर्थ रामदास स्वामींच्या विविध वांग्मयावर अनेक वर्तमानपत्रातून आणि सज्जनगड मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन करून आनंद जोगळेकर यांच्या “श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन” या ग्रंथाचे पुण्यातील धर्मावत नगर येथे दिनांक २७ जुलै रोजी प्रकाशन करण्यात आले. या वेळी समर्थ साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. विजय लाड यांनी समर्थ वाङ्मयातील अनेक संदर्भ घेऊन श्री नृसिंह स्तवन यावर माहिती दिली.
या प्रकाशन सोहळ्याच्या प्रारंभी समर्थ रामदास स्वामी आणि पूजनीय अक्का स्वामी वेलणकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
आनंद जोगळेकर यांनी दासबोधाचा सखोल अभ्यास करीत असताना समर्थांच्या विविध वांग्मय प्रकारावर लेखन केल्याचे आणि सज्जनगड मासिक पत्रिकेचे कार्यकारी संपादक मधू नेने यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लेख प्रसिद्ध झाल्याचे सांगितले. १६ विषयांवर लिहिलेले हे लेख “श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन” या पुस्तकामध्ये असून मुंबई येथील श्री सुनील संत यांनी या ग्रंथाचे मुद्रण केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौ. अंजली खळदकर यांनी अभंग सादर केला.
सौ. विनया विद्वांस यांनी त्रयोदशाक्षरी मंत्राची माळ घेतली. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक सौ. अपर्णा वांगीकर यांनी केले तर सूत्र संचलन सौ. शुभदा थिटे यांनी केले. सौ. वृंदा जोगळेकर यांनी आभार व्यक्त केले.

