सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करा, तहसीलदार वर्षा झालटेंचे आवाहन…
मालवण
केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र प्रमाणेच करण्यासाठी सत्यापन ॲप ही नवीन सुविधा विकसित करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत सामाजिक विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती निवृत्ती वेतन योजना या योजनेंतर्गत समाजातील उपेक्षित निराधार व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी प्रत्येक महिन्यात आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र प्रमाणित करण्यासाठी सत्यापन ॲप ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी मोबाईल वरून स्वतः, सेतू सुविधा केंद्र, महा-ई- सेवा केंद्र, पोलीस पाटील, आशा वर्कर्स किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत आधार प्रमाणिकरणाचा वापर करून हयात दाखला प्रमाणीत करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्रीमती. झालटे यांनी केले आहे. प्रमाणित केलेले हयात दाखले संबंधित पोर्टलवर थेट लिंक होणार आहेत.
गुगल प्ले स्टोअर मधून आधार फेस आरडी ॲप व बेनिफिशरी सत्यापन ॲप डाउनलोड करून घ्यावे. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ओटीपी टाकून ॲप रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर लाभार्थ्यांचा आधार क्रमांक, ओटीपी टाकून मोबाईलचा कॅमेरा वापरून डोळ्यांची हालचाल करून हयात प्रमाणपत्र प्रमाणित करून शासनाच्या योजनेचा लाभ सुरू ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

