You are currently viewing व्ही.एन.नाबर विद्यालय बांदा येथे ऐकू आली कारगिल विजयाची धून..

व्ही.एन.नाबर विद्यालय बांदा येथे ऐकू आली कारगिल विजयाची धून..

व्ही.एन.नाबर विद्यालय बांदा येथे ऐकू आली कारगिल विजयाची धून..

बांदा

कारगिल विजय दिवस हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्वाचा दिवस आहे.भारतात २६ जुलै रोजी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९९ साली भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं होतं.हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण ६० दिवस चाललं.२६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला.कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो.देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे बांदा येथील व्ही. एन.नाबर इंग्लिश मीडियम शाळेतसुद्धा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक, कॅप्टन श्री.शंकर भाईप आणि विशेष अतिथी म्हणून हवालदार श्री.किरण सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ.शिल्पा कोरगावकर उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देसाई मॅडम यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व परिचय केला.प्रशालेचे सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभागृहात उपस्थित होते. ‘दुनिया करते ज्याला सलाम, तोच आहे भारताचा सैनिक महान’ या वाक्याशी समन्वय साधून शाळेत शहीद सैनिकांना मानवंदना देण्यात आली आणि पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

तदनंतर कारगिल दिवसाचे महत्त्व सांगत मुख्याध्यापिका देसाई मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कारगिल दिवस हा फक्त विजय नसून भारताच्या इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले.

त्यानंतर इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी श्रेया हळदणकर हिने आपले मत व्यक्त करताना तिने सैनिकाचे जसे लोकांची रक्षा करणे हे कर्तव्य आहे तसेच जे सैनिक शहीद होऊन आपल्याला स्वातंत्र्य देऊन गेले त्यांच्याप्रती नुसता आदरच नव्हे तर त्यांनी मिळवून दिलेल्या स्वतंत्र्याचा सांभाळ करणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्यांचा आपण सर्वांनी आदर्श ठेवला पाहिजे असे सांगितले.

त्यानंतर विशेष अतिथी म्हणून लाभलेले माजी सैनिक श्री.सावंत यांनी सर्वात प्रथम भारतीय सैन्याबद्दल कौतुक करण्याची चांगली भावना शाळेजवळ आहे म्हणून शाळेचे कौतुक केले. आपल्या सैनिकी जीवनाबद्दल सांगताना,ते वयाच्या १८ व्या वर्षी सेवेत दाखल झाले.२००२ मध्ये मराठा लाइन रेजिमेंट मध्ये ग्लेशियर येथे नियुक्ती झाली.उणे ७ डिग्री तापमानात सेवा बजावत असताना कितीही संकटे आली तरी ती संकटे न समजून त्यांना सामोरे जाण्याची मानसिकता तसेच शारीरिकता प्रशिक्षण कालावधीत दिली जाते.सेवेच्या काळात शारीरिक स्वास्थ आणि वेळेचे नियोजन कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले.सैनिक हा एक त्यागाचा प्रतीक आहे.त्याला आपले पालक, भाऊ बहीण,बायको मुलं व वेळप्रसंगी जीवाचा त्याग करून आपले कर्तव्य पार पाडावे लागते.त्यात आपल्या देशाचं रक्षण करणे ही फक्त एका सैनिकाचीच जबाबदारी नसून आपण शालेय जीवनातसुद्धा याची दखल घेतली पाहिजे.हीच दखल काहीप्रमाणात आज समाज घेत आहे हे बघून उर भरून येतो आणि छाती आजुन ताठ होते.कुठलीही परिस्थिती आली तरी त्यावर मात ही केलीच पाहिजे असे सांगून त्याच बरोबर आपण स्वतःला शारीरिकरित्या सक्षमही केले पाहिजे असे सांगत मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले.

त्यानंतर प्रमुख अतिथी कॅप्टन श्री.भाईप हे कास गावचे सुपुत्र असून वयाच्या १८ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले.यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मला जेव्हा फोन करून ह्या कार्यक्रमाला बोलावण्याची विनंती केली तेव्हा माझ्यातील सैनिकाचे हृदय त्या विनंतीला नाकारू शकले नाही.जे सैनिक वीरगती पत्करतात त्यांची कमी ही त्यांच्या कुटुंबाला नाही तर आपल्याला आणि आपल्या पुढील पिढ्यांनाहीअसेल आणि त्यांचे हे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही.शालेय जीवनात उपयोगी गोष्टी विषद करून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करून सैन्यात भरती होण्यासाठी ऑपरेशन सिन्दुर चे उदाहरण देऊन प्रोत्साहित केले .

कॅप्टन श्री.भाईप यांनी मुलाला प्रेरित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण आत्मसात करा यासाठी यांच्या जीवनावर आधारलेले शिवशंभो हे पुस्तक शाळेला भेट दिले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.स्नेहा नाईक तर आभार शिक्षिका सौ. सुप्रिया पाटील यांनी मानले.वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा