सावंतवाडीत २८ जुलैला “मोबाईल व्हॅनच्या” माध्यमातून कर्करोग तपासणी होणार…
सावंतवाडी
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, नागरिकांच्या सोयीसाठी ‘कर्करोग मोबाईल व्हॅन’ उपलब्ध करण्यात आली आहे. ही विशेष व्हॅन २८ जुलै ला उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी व जनजागृतीसाठी उपलब्ध असेल. या महत्त्वपूर्ण मोहिमेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळीच नियंत्रण मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेत कर्करोगाच्या प्रमुख प्रकारांची लक्षणे आणि लवकर तपासणीचे महत्त्व यावर भर देण्यात येत आहे. कर्करोगाची संभाव्य लक्षणे खालीलप्रमाणे: मुख कर्करोग: दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ तोंड येणे, तोंडात लाल किंवा पांढरे चट्टे असणे, तोंड उघडण्यास त्रास होणे. स्तन कर्करोग: स्तनामध्ये गाठ येणे, स्तनांच्या आकारात बदल होणे, स्तनाग्रातून पू किंवा रक्तस्त्राव होणे. गर्भाशय मुख कर्करोग: मासिक पाळीव्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव होणे, मासिक पाळी थांबल्यानंतर रक्तस्त्राव होणे, शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे. आरोग्य विभागाने असे आवाहन केले आहे की, वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
