*ज्येष्ठ कवयित्री सौ. चित्रा पुरुषोतम चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
“श्रावण”
वसुंधरेच्या गालिच्यावर बसण्या ।
श्रावण आला ग पाहुणा ।।
घेऊनी सणांचा नजराणा ।
स्वागत करिते ये “श्रावणा”
।। १ ।।
आषाढाचं पांघरुण।
आला श्रावण सारुन।।
त्याच्या स्वागताला उभं ।
माझं उल्हसित मन ।। २ ।।
खळाळत्या निर्झराला ।
वाहे सुखाचं उधाण ।।
घेऊन आनंदाचं वाण ।
आला श्रावण श्रावण ॥ ३ ।।
हिरव्यागार शालूची।
वसुंधरेला ग पसंती ।।
साऱ्या ओल्या शिवाराला ।
आली नव्या कोंबाची नवती ।। ४ ।।
गोड गळ्याच्या स्वरांनी।
कोकिळा घालते ग शीळ ।।
चिंबधारांनी ओला ऐकतो ।
बरसता घननीळ ।। ५ ।।
नववधूच्या पैजणानं ।
सारे सण झणकारले ।।
निसर्गाच्या किमयेनं।
सारे यौवन बहरले ।। ६ ।।
सुखावून जातो असा।
चैतन्याचा ग बहर ।।
बळीराजाच्या घामानं ।
ओलावलं ग शिवार ।। ७ ।।
रम्य श्रावणाच्या मासी ।
शंभू पार्वतीची वस्ती ।।
बेलफुलांनी सजली ।
अवधी काळीसावळी धरती
।। ८ ।।
अशा श्रावणाचा झाला ।
हर्ष माझ्या ग मनाला ।।
भविष्याची स्वप्नवेल ।
लागली ग फुलायला ।। ९ ।।
सौ. चित्रा पुरुषोतम चौधरी
सिद्धीविनायक नगर, कठोरा रोड,वि.म.वि.
अमरावती 4
मो.नं. ९६८९७२३७६५

