महाराष्ट्रातील प्राचार्यांचे एक अधिवेशन येत्या 25 व 26 जुलै रोजी अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात होत आहे त्यानिमित्त
विद्यार्थ्यांना दिशा देणारा एक घटक : प्राचार्य
अमरावतीची श्री शिक्षण शिवाजी शिक्षण संस्था ही महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कर्मवीर श्री भाऊराव पाटील यांनी सातारा येथे स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आहे .तर दुसऱ्या क्रमांकावर कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे स्थापन केलेली आमची श्री शिवाजी शिक्षण संस्था ही आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संपूर्ण विदर्भात भरपूर शाखा असून संस्थेचे वार्षिक बजेट कोट्यावधी रुपयांचे आहे.या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात महाराष्ट्रातील सर्व प्राचार्यांचे दोन दिवसाचे अधिवेशन होत आहे. महाराष्ट्रातील प्राचार्य अमरावतीला एकत्र येत आहेत ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.
प्राचार्य हा महाविद्यालयाच्या तंबूचा केंद्रबिंदू आहे. आज शासनाने शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले वेतनमान देऊन समाजाच्या सर्व घटकापर्यंत शिक्षण खऱ्या अर्थाने पोहोचावे यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. आणि शिक्षणाची ही सर्कस सांभाळणारा घटक म्हणजे प्राचार्य.
साधारणपणे 18 वर्षावरील मुले महाविद्यालयात प्रवेश घेतात. हा कालावधी त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट असतो. या परिवर्तनशील काळात त्याला योग्य खतपाणी घातल्या गेले तर तो या भारताचा एक चांगला नागरिक होऊ शकतो. त्याची मोठी जबाबदारी प्राचार्यांवर व प्राध्यापकांवर असते. आताची सेमिस्टर पद्धती प्राचार्यांना प्राध्यापकांना सतत गुंतवून ठेवणारी आहे. एका दृष्टीने ती चांगली ही बाब आहे.
मी गेल्या पंचवीस वर्षापासून आयएएस या क्षेत्रात काम करीत असल्यामुळे मला प्रामाणिकपणे वाटते की विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व महाविद्यालयीन जीवनात अधिक घडते. मुलांचे व्यक्तिमत्व तत्पर तेजस्वी व तपस्वी होते ते याच जीवनामध्ये. या कामात प्राचार्यांची भूमिका महत्त्वाची आहे. असे पाहिले तर प्राचार्यपद म्हणजे तारेवरची कसरतच आहे. विद्यापीठ. संस्थेचे कार्यकारी मंडळ. प्राध्यापक व विद्यार्थी हे चार घटक त्यांना सांभाळावे लागतात. हे चार घटक सांभाळताना अनेक प्राचार्यांची घालमेल होते आणि ते साहजिकच आहे. पण यातून आपल्याला चांगला मार्ग काढता येऊ शकतो.
विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांसाठी चर्चासत्र घेणे गरजेचे असते. प्राध्यापकांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ठिकाणी गुणवत्ता आहे याबद्दल वाद नाही .पण या गुणवत्तेला अधून मधून धार लावावी लागते आणि ती धार जर योग्य लागली तर मग पुढची कामे अतिशय सुलभ रीतीने व जलद गतीने होणे शक्य आहे.
मी विद्यार्थ्यांना कलेक्टर होण्याची शक्यता दाखवितो. त्यासाठी 25 वर्षापासून मी काम करीत आहे. प्रत्येकच मुलगा कलेक्टर होईल असे नाही. पण कलेक्टरची परीक्षा ही भारतातील सगळ्यात मोठी परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेची जो विद्यार्थी तयारी करेल तो भारतातील कोणतीही परीक्षा सहज पास होऊ शकेल. याशिवाय या परीक्षेची तयारी करताना त्याचे जे व्यक्तिमत्व तयार होईल ते अनन्यसाधारण असेल .
तो कुठेही गेला तरी त्या क्षेत्रात तो स्वतःचे कौशल्य सिद्ध करू शकेल. शिवाय ही परीक्षा देण्यासाठी पदवी परीक्षेला फक्त 35 टक्के गुण लागतात आणि पहिली परीक्षा पास होण्यासाठी 25 गुण लागतात. परीक्षा मराठीमध्ये देता येते. आणि प्रश्नाचे स्वरूप हे पहिल्या परीक्षेला वैकल्पिक स्वरूपाचे असते. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यास केला तर आयएएस म्हणजे कलेक्टर होणे अवघड नाही.
जे प्राचार्य पुढाकार घेऊन महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवितात .विविध वक्त्यांना बोलावितात त्यांचे मार्गदर्शन घडवून आणतात. त्यांच्या कार्यशाळा घडवून आणतात. ते प्राचार्य खरोखरच देव माणसे आहेत. कारण मोठ्या पदावर विराजमान झालेल्या सर्वांचे तुम्ही अनुभव ऐका. त्यांच्या जीवनात असा एक टर्निंग पॉईंट आलेला आहे. ज्या टर्निंग पॉईंटला विद्यालयात किंवा महाविद्यालयात घडलेल्या एखाद्या कार्यशाळेमुळे त्याच्या जीवनामध्ये कायापालट झाला आहे .
सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांची आपण उदाहरण घेऊ या. ज्या गावात शाळा नाही .त्या गावातला हा मुलगा. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूडचा राहणारा. पण तो कोल्हापूरला न्यू कॉलेजमध्ये शिकायला आला. योगायोगाने प्राचार्यांनी कलेक्टर साहेबांना कार्यक्रमाला बोलाविले.श्री भूषण गगराणी हे तेव्हा कलेक्टर होते. त्यांच्या भाषणाचा विश्वास नांगरे पाटलांवर एवढा परिणाम झाला की त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आयएएसची तयारी केली व आज एक चांगला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे.
सनदी व राजपत्रित अधिकारी महाविद्यालयात येण्यास नेहमी तयार असतात. बरं या अधिकाऱ्यांना प्रवास खर्च नको .मानधन नको .पण अशा प्रकारचे अधिकारी जर आपल्या महाविद्यालयात आले तर सोनाराच्या हाताने कान टोचले जातात असा प्रकार होतो. पोलीस अधिकारी आले तर त्यांच्या ड्रेस कोड मुलांना आकर्षित करतो व ते आपल्या भावी जीवनामध्ये योग्य तो बदल करू शकतात.
बऱ्याच मान्यवर व प्रतिष्ठित लोकांनी विद्यालयात आणि महाविद्यालयात जे शिकायला मिळते त्यापेक्षा कितीतरी जास्त समाजामध्ये निसर्गामध्ये शिकायला मिळते असे विधान केलेले आहे. विद्यार्थी महाविद्यालयामध्ये पाच तासच असतो. उर्वरित 19 तास तो समाजात वावरत असतो. केंद्र शासनाने राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना या अंतर्गत विद्यार्थ्यांना समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी लहान सहान कामे करायला तयार असतात. श्रमदान करायला तयार असतात. मला आठवते मी अमरावती विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय शिबीर घेतले होते. घरी कोणतेही काम न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरात मन लावून सर्व प्रकारची काम केली होती. आणि म्हणूनच महाविद्यालय हे विद्यार्थ्यांची जडणघडण होणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील सगळ्या प्राचार्यांना एकत्र बोलाविले आहे. दोन दिवस शैक्षणिक वैचारिक सामाजिक सांस्कृतिक देवाणघेवाण होणार आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मानवी मन रिलॅक्स होण्यासाठी संगीताची साहित्याची सांस्कृतिक कार्यक्रमाची तेवढीच गरज आहे. संस्थेने सुप्रसिद्ध गझल गायक गजलरत्न प्रा. डॉ. राजेश उमाळे यांच्या गझलेचा कार्यक्रम अधिवेशनात ठेवून या अधिवेशनाचा एक सुवर्णमध्य साधला आहे.
आता प्रत्येक महा विद्यालयामध्ये करिअर कट्टा सुरू केला आहे. त्यासाठी सुरुवात झाली की आमच्यापासून. महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये 16,178 कार्यक्रम घेऊन आम्ही जागतिक उच्चांक गाठला आहे. मानधनाची अपेक्षा नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी घडला पाहिजे ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महाविद्यालयामध्ये आमच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा झाल्या आहेत. त्या त्या महाविद्यालयाने आमचे मनापासून स्वागत केले आहे. आणि म्हणूनच हे सर्व महाराष्ट्रातील प्राचार्य एकत्र येत असताना या दोन दिवसाच्या अधिवेशनातून त्यांना नवीन दृष्टी मिळेल आणि त्या दृष्टीचा उपयोग ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी करतील अशी रास्त अपेक्षा आहे.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती कॅम्प
9890967003

