पत्रकारांच्या रेल्वे सवलतीसाठी केंद्र सरकारकडे पुन्हा मागणी;
‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या निवेदनाला खासदार अमर काळे यांचा पाठिंबा
नवी दिल्ली
कोरोना महामारीपूर्वी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळणारी ४० टक्के रेल्वे प्रवास सवलत पुन्हा लागू करण्यात यावी, अशी ठाम मागणी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. या मागणीला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर शरदराव काळे यांनी सक्रिय पाठिंबा दिला असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांनी अधिकृत निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “कोरोना काळात तात्पुरती थांबवण्यात आलेली ही सुविधा अद्याप पुन्हा सुरू झालेली नाही. परिणामी, पत्रकारांना अनेक वेळा आर्थिक अडचणींचा सामना करत शासकीय कार्यक्रम, पत्रकार परिषद किंवा इतर महत्वाच्या कार्यक्रमांसाठी प्रवास करावा लागतो.”
‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या म्हणण्यानुसार, पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून, शासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या कामास मदत करणाऱ्या सुविधा पूर्ववत करणे सरकारचे कर्तव्य आहे, असा आग्रह संघटनेने धरला आहे.
खासदार अमर काळे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “पत्रकारांसाठी रेल्वे सवलत ही केवळ एक आर्थिक मदत नाही, तर त्यांच्या सेवाभावाला दिलेली एक सरकारी मान्यता आहे. ही सुविधा त्वरित पुन्हा सुरू व्हावी, यासाठी मी संसदेतही आवाज उठवणार आहे.”
सध्या ही मागणी पत्रकार वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
