गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांची गर्दी;
खासदार नारायण राणेंची रेल्वेमंत्र्यांकडे जादा गाड्यांची मागणी
सिंधुदुर्ग
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आदी शहरांतील कोकणवासीय मोठ्या संख्येने आपल्या मूळगावी जातात. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडाव्यात व तिकीट आरक्षण वेळेत सुरू करावे, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या भेटीत श्री. राणे यांनी निवेदन देत म्हटले की, यंदा गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट रोजी असून विसर्जन ६ सप्टेंबर रोजी आहे. या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते. आरक्षणाची कमतरता आणि गोंधळ टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने वेळेत पावले उचलावीत.
२०२४ मध्ये ३४२ विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर यंदाही विशेष गाड्यांची घोषणा करावी, तसेच विद्यमान गाड्यांमध्ये स्लीपर व जनरल डबे वाढवावेत, अशीही मागणी त्यांनी केली. चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आदी स्थानकांवर विशेष गाड्या थांबाव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी श्रद्धा आणि कौटुंबिक एकत्रतेचा महत्त्वाचा काळ असल्याने रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक पावले उचलावीत, असा आग्रह राणेंनी धरला.
