You are currently viewing सिंधुदुर्गमध्ये ‘भजन सदन’ उभारणार; भजनी परंपरेला नवे बळ देण्याचा पालकमंत्री नितेश राणेंचा संकल्प

सिंधुदुर्गमध्ये ‘भजन सदन’ उभारणार; भजनी परंपरेला नवे बळ देण्याचा पालकमंत्री नितेश राणेंचा संकल्प

सिंधुदुर्गमध्ये ‘भजन सदन’ उभारणार; भजनी परंपरेला नवे बळ देण्याचा पालकमंत्री नितेश राणेंचा संकल्प

कुडाळ

भजन हे केवळ एक संगीतप्रकार नसून, आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि तिला संस्थात्मक स्वरूप मिळावे, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच “भजन सदन” उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ज्येष्ठ बुवा श्री. परब, मोहन सावंत, बुवा श्री. पारकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना श्री. राणे म्हणाले, “भजनी परंपरेतून केवळ भक्तीभाव व्यक्त होत नाही तर हिंदुत्वाचे विचारही समाजात पसरवले जातात. त्यामुळे महायुती सरकार भजनी कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. ‘भजन सदन’ या उपक्रमातून कलाकारांना एक स्थायी आणि सुसज्ज मंच मिळेल, जिथे ते आपल्या कलेचा विकास करू शकतील आणि नव्या पिढीला भजनी परंपरेची ओळख करून देऊ शकतील.”

भजन स्पर्धेला जिल्हाभरातून कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, या माध्यमातून नवोदित आणि पारंपरिक कलावंतांना आपले गुण सादर करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

भविष्यात ‘भजन सदन’ ही केवळ एक वास्तू न राहता, जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक बनेल, अशी अपेक्षा आता सर्वत्र व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा