You are currently viewing एक पावसाळी रात्र

एक पावसाळी रात्र

*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री माया कारगिरवार लिखित अप्रतिम कथा*

 

*एक पावसाळी रात्र* 

 

आज सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू होती. रात्रीपासून संतत धार पाऊस सुरू होता .दुपार होताच थोडा थांबला होता .तरीही वातावरणामध्ये म्हणावा तसा गारवा नव्हता. वातावरण तसंही दमटच होतं. उकाड्याने हैरान होत होतं.. चार वाजायला आले होते.. वर्षा हातात चहाचा कप घेऊन गॅलरीतल्या झोपाळ्यावर बसली.. तितक्यात आभाळ पुन्हा भरून आलं ….

मृग नक्षत्रात सुरू झालेला हा पाऊस आषाढ मेघ बनून धुंवाधार बरसतो .श्रावणात सोनकिरणांसोबत भुरभुर पडून मनाला चैतन्य प्रदान करतो. माणसाच्या मनालाही सृष्टी सारखा हिरवा करतो हा पाऊस.. .

वर्षालाही पाऊस खूप आवडायचा. ती पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत राहायची.. पण आता मात्र ती पावसाळ्याची तितक्या आतुरतेने वाट बघत नाही. कारण तिच्या आयुष्यात पावसाळ्यात घडलेल्या काही घटना ंमुळे ती व्यथित होते.. तिच्या जाणिवांचा एक एक पापुद्रा सोलल्या जातो पाऊस सुरू झाला की…

वर्षा झोपाळ्यावर बसून भूतकाळातल्या आठवणींना आठवू लागते.. तारुण्याला जशी मोरपंखी स्वप्नांची भूल पडते तशी पावसाळ्यात जोडीदाराच्या सहवासाच्या आठवांच्या कळ्या उमलू लागतात आणि जुळलेले बंध एकमेकांची मने जपू लागतात..

वर्षाला लग्न पूर्वीचे दिवस आठवतात .अशाच एका पावसाळी संध्याकाळी एका बस स्टॉप वर वसंताची आणि तिची भेट होते. आभाळ भरून आले असते ..बस अजून पर्यंत आलेली नसते.. घरी जायला उशीर होत होता ..आई-बाबा वाट पाहत असतील याची काळजी तिच्या चेहऱ्यावर दिसू लागते .बस स्टॉप वर दूर उभा राहून वसंत तिच्या मनातली काळजी वाचत असतो ..वर्षा दिसायला सुंदर असते. लांब सडक काळेभोर केस, रंग गव्हाळ असला तरी पहिल्या दृष्टीक्षेपात अगदी मनाला मोहून टाकणार असं तिचं सौंदर्य असते.. वसंताला एका दृष्टीक्षेपातच वर्षा आवडलेली असते.. पण तो काही बोलत नाही. बस स्टॉप वरची सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या आलेल्या बसेस मधून निघून जातात. बस स्टॉप वर फक्त वर्षा आणि वसंत दोघंच थांबलेले असतात.. शेवटी वसंताच पुढाकार घेतो आणि विचारतो ,”मॅडम तुम्हाला कुठे जायचंय..? ती ,”शिवाजी नगर ,एवढंच बोलते… आज बस का आली नाही अजून पर्यंत म्हणून त्याला विचारते ..वसंत पण तिच्याच एरियात राहत असतो.. मग तो म्हणतो,” की आपल्या भागाकडे जाणारी बस आज का आली नाही कळत नाही पण आपण रिक्षाने जाऊया कां ? तुम्हाला जर काही अडचण नसेल तर. कारण मी सुद्धा त्या भागातच राहतो.. वर्षा घड्याळ बघते साडेआठ वाजून गेलेले असतात.. आई-बाबा काळजीत असतील .. असा विचार करून ती त्याला मानेनेच होकार देते.. वसंता सोबत रिक्षातून वर्षा घरी पोहोचते. रिक्षात एकमेकांच्या बोलण्यातून ओळख निर्माण होते. वसंता एका चांगल्या कंपनीमध्ये काम करत असतो. आणि वर्षा एम. एस. ई. बी. मध्ये कामाला असते.( महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ) वसंता चे ऑफिस वर्षाच्या ऑफिसच्या थोडं पुढे असतं ..त्यामुळे आता ओळख झालेली असल्याने नेहमीच बस स्टॉप वर त्यांची भेट होत असते आणि वसंत मनमिळावू स्वभावाचा असतो आणि खूप सहकार्याची भावना असते त्यांच्या मनात आणि खूप रिस्पेक्टफुली त्याचं वागणं असतं . त्यामुळे वर्षाला त्यांचे व्यक्तिमत्व खूप आवडायला लागतं.. कालांतराने दोघांमध्ये खूप छान मैत्री होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. दोघांचीही एकमेकांच्या घरच्यांशी चांगली ओळख होते .दोन्ही घरांमध्ये खूप चांगले सलोख्याचे संबंध निर्माण होतात. वर्षाच्या आई-बाबांना पण वसंत मनातून आवडलेला असतो.. आणि वसंताच्या आई-वडिलांना पण वर्षा खूप आवडली असते . तिच्या व्यक्तिमत्वाने ते भारलेले असतात.. वसंता शी बोलून ते एक दिवस वर्षाच्या घरी जातात आणि तिच्या आई-वडिलांशी बोलून वर्षाला मागणी घालतात..

डिसेंबर महिन्याच्या एका गारठलेल्या संध्याकाळी वर्षा आणि वसंता विवाहबद्ध होतात. नव्या जीवनाची सुरुवात होते . लग्नानंतर दोघांचे सूर छान जुळतात .संसार सुखाचा सुरू होतो .दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात. पण लग्नानंतर सहा सात वर्षानंतर त्यांच्या संसार वेलीवर फुल उगवते. त्यांना मुलगा होतो. नाव त्याचं पंकज असते .वर्षा, वसंत आणि पंकज आजी-आजोबा सगळ्यांचे आनंदामध्ये दिवस चाललेले असतात दिवसागणिक पंकज मोठा होत जातो. एकुलता एक असल्यामुळे वर्षाआणि वसंत त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात … दिवसा मागून दिवस जात असतात आणि अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. संपूर्ण जगात एक भीतीची लहर निर्माण झाली असते. अशातच वसंताचा कोरोनामध्ये मृत्यू होतो .वर्षावर आभाळ कोसळतं.. वसंता चा मृत्यू तिला हादरवून टाकतो. पण डोळ्यासमोर पंकज येतोय.. त्याचे भविष्य सांवरायचं असते म्हणून ती स्वतःला सावरते. आणि सगळे लक्ष आपल्या एकुलत्या एक मुलावर पंकज वर केंद्रित करते.. आणि पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात करते. पंकज आता मोठा झाला आहे. तो कॉलेजला जायला लागला. पंकजचे कॉलेज घरापासून जरा बरंच दूर असतं त्यामुळे वर्षा त्याला स्कूटर घेऊन देते . पंकज खूप सालस मुलगा असतो .अभ्यासू असतो .कॉलेजमध्ये नेहमीच पहिला नंबरनी पास होत असतो .त्याने आईचा विश्वास कमवला असतो .त्यामुळे वर्षा आता बिनधास्तपणे ऑफिसला जायला लागली असते. तिचाही स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे ऑफिसमध्ये मित्रमंडळी , नातेवाईक मंडळी वर्षावर जीव लावणारी असतात. त्यामुळे वर्षा आता पंकज सोबत छान रूळलेली असते ..जीवनाची वाटचाल तिची आता वेगवान झाली असते. तरीपण वसंताच्या आठवणींनी बरेचदा ती

गदगद होते.. झोपाळ्यावर बसले की वसंताच्या सहवासातल्या आठव कळ्या उमलू लागतात. आणि तिच्या मनावर त्याच्या आठवणींचा पाऊस कोसळू लागतो ..पावसाळा आला की पडणारा पाऊस तिच्या सुगंधी स्वप्नांना संयमांच्या हिंदोळ्यावर ओसंडून वाहून ओढ निर्माण करतो.. वसंताच्या आठवणीत मात्र ती झोपाळ्यावर बसलेली असते तेव्हा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते…

अशीच वर्षामागून वर्षे जातात. पंकजचे आता इंजिनिअरिंगचे शेवटचं वर्ष असते. पावसाळी सहलीसाठी पंकज मित्रांसोबत एका निसर्गरम्य ठिकाणी गेलेला असतो. त्यादिवशी सकाळपासून आभाळ अगदी निरभ्र असतं .छान ऊन पडलेले असतं. त्यामुळे वर्षा देखील त्याला सहलीला जाण्याची परवानगी देते.

.छान हसत हसत तो मित्रांसोबत स्कूटरने सहलीला जातो .त्याचा हसरा चेहरा दिवसभर वर्षाच्या नजरेमध्ये खेळत असतो ..रात्री बराच उशीर होतो त्यांना परत यायला म्हणून वर्षा पंकजला फोन करते..” पंकज फोनवर बोलतो ,”आई आम्ही निघालो आहे.बस आता अर्ध्या पाऊण तासात पोहोचतोच आम्ही घरी.. एवढं बोलून तो फोन बंद करतो आणि सगळे मित्र मंडळी स्कूटरने परतीच्या प्रवासाला लागतात .निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे रस्ता चकचकीत गुळगुळीत आणि घाटा घाटाचा असतो. खूप सुंदर गाणी म्हणत आनंदाने त्यांचा प्रवास सुरू असतो. थोडी रात्र झालेलीच असते आणि गावाच्या जवळ आल्यानंतर अगदी गच्च आभाळ भरून येते आणि जोरदार पावसाला सुरुवात होते.. अगदी गाव एका किलोमीटरवरच राहिलेले असतं आणि वळणावळणाचा रस्ता येतो आणि मुसळधार पावसाला सुरुवात होते… विजांच्या संगीता सह घनगर्जना करीत त्यादिवशी पाऊस धुवांधार कोसळतो. अगदी त्या पाऊसधारामुळे त्याला स्कूटर चालवताना थोडा त्रास होत असतो . *ती पावसाळी रात्र*.. ती इतकी भयानक होईल असं त्या दिवशी कोणालाच वाटलं नसते .पण तो दुर्दैवी क्षण पंकजच्या आयुष्यात येतो.. एक मित्र पण त्याच्या स्कूटरवर बसलेला असतो आणि एका वळणावर समोर येणाऱ्या भरदार ट्रकने पंकजच्या स्कूटरला धडक दिलेली असते आणि त्या ठिकाणी पंकज आणि त्याच्या मित्राला मृत्यू जागेवरच कवटाळतो .. वर्षाला बातमी कळते. नातेवाईकांसोबत वर्षा त्या स्पॉटवर जाते..ते भयाण दृश्य…. आपल्या एकुलता एक मुलाचा असा रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडलेला देह पाहून तिचा टाहो आकाश भेदून जातो..तिची शुद्ध हरपते.. ती पावसाळी रात्र ओली नाही तर तिच्या आयुष्याचा वनवा बनते.. आयुष्यातील सगळी आनंदाची स्तोत्रे पाण्याच्या ओघळासारखी वाहून जातात.. आणि नैराश्याच्या गर्तेत तिच्या जीवनाची वाटचाल सुरू असते .. एका पावसाळी रात्रीने दिलेली कलाटणी झेलत….

🌦️🌩️🌩️🌨️

प्रतिक्रिया व्यक्त करा