शांतिनिकेतन: नाटळ गावातील निसर्गमय वारसा आणि साहसी उपक्रमांचे नवसंजीवनी केंद्र
कणकवलीपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नाटळ गाव हे निसर्ग आणि संस्कृतीचा सुंदर संगम असलेले खेडेगाव आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभलेले हे गाव उंचच उंच डोंगररांगा, हिरवळ आणि धबधब्यांमुळे निसर्गप्रेमींना सतत आकर्षित करतं.
गावाच्या आग्नेय दिशेला असलेल्या कोल्हेवझर धबधब्याच्या परिसरात वसलेल्या मुरग्याच्या माळ्यावर एक झोपडी अनेक वर्षांपूर्वी गुरे राखणाऱ्या शेतकऱ्यांनी उभारली होती. सुरुवातीला गवताची असलेली ही झोपडी पुढे मातीच्या भिंती आणि मातीच्या नळ्यांच्या छपराने सुसज्ज करण्यात आली. झोपडीमध्ये बसून चारही बाजूंना चरणाऱ्या गायी-बैलांचा सहजपणे पाहता येईल असा रचना केली गेली होती.
शांतिनिकेतनचा जीर्णोद्धार आणि नामकरण
सह्याद्री प्रेमी ग्रुप – नाटळ यांच्या पुढाकाराने या झोपडीचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला. लोखंडी रीप आणि मंगलोरी कौले वापरून झोपडीचे छप्पर अधिक मजबूत करण्यात आले आणि तिचा आकारही वाढविण्यात आला.
२० जुलै २०२५ रोजी या झोपडीला ‘शांतिनिकेतन’ हे नाव देण्यात आले. नामकरण सोहळ्यात ग्रामस्थ श्री. शांताराम वायंगणकर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम
या निमित्ताने सकाळी श्रीसत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी श्री मुंडले गुरुजी यांनी हरिपाठ व दासबोधातील साधन निरूपण या विषयावर प्रवचन दिले. रात्री श्री बापू देसाई (नरडवे) यांचे सुश्राव्य भजन झाले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास सरपंच श्री. सुनील गावकर, उपसरपंच श्री. पंढरीनाथ तायशेटे, माजी सभापती श्री. सुरेशजी सावंत, सन्माननीय उदय सावंत, राजू सावंत, विकास पांचाळ, सत्यवान सुतार, आशिष शिरोडकर, महेश वाळके, संतोष म्हाडेश्वर, मेस्त्री सर, विलास काजरेकर, सह्याद्री प्रेमी ग्रुपचे सदस्य, तसेच नाटळ ग्रामस्थ, पंचक्रोशीतील निसर्गप्रेमी, महिलावर्ग, आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसर्गसंपन्न शांतिनिकेतन – एक पर्यटक स्थल
उत्तुंग सह्याद्री, धबधब्याचा खळखळाट, आल्हाददायक हवा, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि हिरवळ यांनी नटलेले हे शांतिनिकेतन लवकरच एक नवीन पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल, याची खात्री आहे.
वर्षभर होणारे उपक्रम
या शांतिनिकेतनमध्ये दरवर्षी:
आंतरराष्ट्रीय योगदिन
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन
वनभोजन
धबधबा परिसर स्वच्छता मोहीम
रॅपलिंग व नाईट स्टे
शालेय विद्यार्थ्यांसोबत विविध कार्यक्रम
असे अनेक उपक्रम सह्याद्री प्रेमी ग्रुप मार्फत आयोजित केले जातात.
आमंत्रण
सुरेश सावंत सांगवे यांचे म्हणणे आहे,
> “साहेब, एक दिवस तरी आमच्या झोपडीला या. मोठा धबधबा आहे, आजूबाजूला घनदाट जंगल आहे, फार निसर्ग सौंदर्य आहे. थोडं चालावं लागतं, पण एकदा आलात तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे कुटुंबासोबत वेळ कसा जातो ते कळणार नाही!”
लेखक: पराग मुंडले
स्त्रोत: सह्याद्री प्रेमी ग्रुप – नाटळ
थोडक्यात: शांतिनिकेतन हे निसर्ग, अध्यात्म, आणि साहस यांचे प्रतीक ठरत असून, नाटळ गावाच्या वैभवात भर घालणारा एक अनमोल ठेवा बनला आहे.
