*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ओस पडली काळी आई*
********************
ओस पडली आज माझी धरणी काळी आई
पाहू कसा शेतात तुला सावळे विठाई?।।धृ।।
राबताना सदा उभ्या पावसाच्या ठोंबात
पाहिले तुला शिवारी बळीराजा रुपात
शेती कसण्या नाही दिसत कुठे आज घाई
पाहू कसा शेतात तुला सावळे विठाई?।।धृ।।१।।
आज बळीराजास शेती वाटे मोठा घोर
कसा नाचेल सांग देवा शेताविना मोर?
शेतावर भिरभिरणारी दिसेना चिऊताई
पाहू कसा शेतात तुला सावळे विठाई?।।धृ।।२।।
तुझ्या लेकरांनी शिवार भरून जाई एकेकाळी
पहावेना आज उजाड पडली सारी आळी
न दिसे राबताना शिवारी विठ्ठल रखुमाई
पाहू कसा शेतात तुला सावळे विठाई?।।धृ।।३।।
सावता माळी कधी नाही गेला विठ्ठलदारी
सदा पाहिले तयाने विठ्ठल अपुल्या शिवारी
काळ्या आईत जाण बळीराजा तुझी भलाई
पाहू कसा शेतात तुला सावळे विठाई?।।धृ।।४।।
मृत होत आहे देवा अमुची धरणी माता
उरला नाही तिजला कोणी कृषक आता
साकडे घालीतो बहरूदे कृषी पुन्हा विठाई
पाहू कसा शेतात तुला सावळे विठाई?।।धृ।।५।।
************************************
*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
*गांव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
🦚🌾🦜🌾🦋🌾🐛🌾🐿️🌾🌻🦚

