कणकवली :
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे आणि मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.
यावेळी तळरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.धनश्री जाधव, प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका डी.सी.तळेकर, सहा.शिक्षिका एस.यु.सुर्वे, व्ही.डी.टाकळे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षण, कुटुंब नियोजन, आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. कारण या माध्यमातूनच आपल्याला लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम समजू शकतील व त्यावर आपण योग्य ते पाऊल उचलू शकतो म्हणून या कारणांचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन डॉ. धनश्री जाधव यांनी कार्यक्रमात बोलताना केले.
जितकी लोकसंख्या जास्त, तितकाच नैसर्गिक संसाधनांचा वापर देखील जास्त होईल. त्यामुळे लोकसंख्या वाढीवर आपण नियंत्रण आणू शकलो तरच नैसर्गिक संसाधनांचा सुद्धा आपण योग्य तो आणि कमी प्रमाणात वापर होईल,असे मनोगत डी.सी. तळेकर यांनी व्यक्त केले.
वरील समस्यांवर उपाय करून पुढील शाश्वत भविष्याची निर्मिती आपण करू शकतो, असे मत सुचिता सुर्वे यांनी यावेळी मांडले.
कुटुंब नियोजनाचे महत्त्व, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यांसारख्या विविध लोकसंख्येच्या मुद्द्यांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सहा.शिक्षक व्हि.डी.टाकळे यांनी केले. तर आभार एस.यु.सुर्वे यांनी मानले.
