छत्रपती संभाजीनगर – ‘ध्यास गझल साहित्य समूह’, ‘टेरेस वरील कविता समूह’, ‘शताब्दी काव्य मंडळ’ आणि ‘ट्रान्स डेल्टा फाउंडेशन आयोजित ‘मन चिंब पावसाळी’ पाऊस,प्रेम आणि इतर कवितांची बहारदार मैफिल मृदगंध कला दालन, N 3 सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे चांगलीच रंगली.पावसाच्या सरींसोबत मनातील भाव भावनांचा वेध घेणाऱ्या दर्जेदार कवितांची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली.सोबतच प्रा.प्रवीण बोबडे ह्यांच्या सुमधुर स्वरात पावसाची गाणी देखील ऐकायला मिळाली.पाऊस, प्रेम ह्यांवरील कविता आणि पावसाच्या गाण्यांनी मैफिल रंगली. कवयित्री कस्तुरी कुलकर्णी ह्यांनी
‘अजूनही ओले पान मनाचे
जरी पुराना झाला पाउस,
आठवणींच्या गावी भेटतो
पुन्हा नव्याने बीज पेरतो.’
ही कविता सादर केली तर श्री रमेश ठोंबरे ह्यांनी
‘कसे साधले ना पुन्हा पावसाने,
तुला गाठले ना पुन्हा पावसाने,
तुझ्या गोड हास्यातूनी जाणले मी
तुला छेडले ना पुन्हा पावसाने.’
ही गझल सादर केली.
सुप्रसिद्ध कवी, गझलकार श्री गिरीश जोशी ह्यांनी,
‘समजला कुठे का कुणा पावसाळा
ऋतुंच्या घरी पाहुणा पावसाळा’
ही गझल सादर करून रसिकांची मने जिंकली.
कवी ऋषभ कुलकर्णी ह्यांनी,
‘झळा सोसून गेलेल्या तुझ्या माझ्या वसंताला,
सुखाची सर बरसणारे नवे श्रावण हवे आहे.’ हे गझलेचे शेर सादर केले. कवी दीपक हापत ह्यांनी
‘असे काय होते तुला पाहतांना
जगाला विसरतो तुला पाहतांना’.
ही गझल सादर केली.तर रूपाली पाटील ह्यांच्या
‘आपणच ठरवायचं की,
कधी द्यायचा पूर्णविराम ‘
ह्या कवितेने मैफलीत रंग भरले. श्री.प्रशांत नानकर ह्यांच्या
‘दोन्ही बरसले तेव्हा,
फरक उमगला नाही,
‘डोळ्यातून आले थोडे,
नभातून आले काही.’
ह्या ओळी दाद घेऊन गेल्या. कवयित्री सुनिता कपाळे ह्यांनी
‘रिमझिम बरसत्या सरीत,
बेभान गंधाळते अवनी’ ही कविता सादर केली.
कवयित्री शमा बरडे ह्यांनी,
‘कशी लिहू पाना फुलांच्या’
ही कविता सादर केली.
प्रा विजय पोहणेरकर ह्यांनी,
‘समजंवावं कुठवरी काही उमगत नाही,
काय झालं कुणा ठावं पाऊस येत नाही’.ही कविता सादर केली. सुप्रसिद्ध गझलकार श्री.
शैलेश देशपांडे ह्यांच्या
‘ती चंद्रभागेसारखी स्पर्शून जाते,
मी वाळवंटासारखा तल्लीन होतो.’ या कवितेने मैफिल रंगवली. श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी ह्यांनी अभंग रचना सादर केली. कवी प्रा. डॉ.सुशिल सातपुते ह्यांनी
‘बरं झालं बाप्पा
तू पक्षात नाहीस,
पक्षांचं चिन्ह म्हणून
कोणाच्या लक्षात नाहीस.’
ही कविता सादर केली.
यासोबतच,कवी श्री विजयकुमार पांचाळ यांच्या
‘अन्नाशिवाय तान्ही लेकरं मरताय
त्यांना कृषीप्रधान देश कळू दे
विठ्ठला अशीच वारी तुझी
माझ्या गावाकडे भरू दे..’ या कवितेला रसिकांची दाद मिळाली. यासोबतच कवयित्री पुर्वा तांदूळवाडीकर, कवी विनायक दास,विनोद सिनकर,हर्षवर्धन दीक्षित,सुशिल देशमाने,अजय त्रिभुवन,श्री आर.पी. शिखरे, पंडित वराडे, अनिल बडवे इत्यादी कवींनी आपापल्या दर्जेदार कवितांनी मैफिल जिंकली. या ‘मन चिंब पावसाळी’ काव्य मैफिलीचे बहारदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी गझलकार श्री गिरीश जोशी यांनी केले. प्रा.प्रवीण बोबडे ह्यांनी ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’, ‘मियां मल्हार रागातली चीज,’ ‘पाऊस दाटलेला’, ‘रिम झीम गिरे सावन,’ ‘श्रावणासारखे,’ ‘बेधुंद,’ इत्यादी गीते गायली त्यास रसिकांची विशेष दाद मिळाली. या मैफीलीच्या यशस्वितेसाठी श्री.प्रशांत नानकर, कवी गझलकार श्री गिरीश जोशी ह्यांनी परीश्रम घेतले.

