You are currently viewing कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक सुनील जंगम यांची आत्महत्या

कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक सुनील जंगम यांची आत्महत्या

कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक सुनील जंगम यांची आत्महत्या

सावंतवाडी

सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक आणि मालवण तालुक्यातील आचरा ओवळीये, जंगमवाडी येथील रहिवासी सुनील बाबी जंगम (वय ५२) यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओवळीये येथील देव साखळी नदी ब्रीजजवळ त्यांचा मृतदेह नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

पोलीसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शनिवार रविवार सुट्टी असल्याने ते गावी गेले होते. सोमवारी ते सावंतवाडी येथे परतणार होते. त्यांना पहाटे लवकर उठण्याची सवय होती. सकाळी ६ वाजता त्यांच्या पत्नी रेश्मा सुनील जंगम (वय ५०) उठल्या असता सुनील घरात नव्हते. त्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना, सकाळी अंदाजे ८ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह देव साखळी नदी ब्रीजच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पत्नीने याबाबत आचरा पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जंगम यांनी कर्जावर एक डंपर घेतला होता. या डंपरच्या कर्जाचे हप्ते थकित झाल्यामुळे ते गेल्या काही काळापासून तणावाखाली होते. याच आर्थिक ताणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक करवंजे करत आहेत.

सुनील जंगम यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. या घटनेमुळे सावंतवाडी आणि मालवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा