*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम ललितलेख*
*त्रिमूर्ती निसर्ग*
ब्रम्हा विष्णू महेश हे त्रिमूर्ती म्हणून मानले जातात. आणि याच त्रिमूर्तीनी निसर्गाच्या जीवन चक्राचे तिन्ही पैलू व्यापले आहेत.
निर्मिती..पालन पोषण..संहार…!
विश्वाचे संतुलन राखण्यासाठी या तिन्ही पैलूंचे सामूहिक महत्त्व आहे. आपण विनाशाच्या भयानक चक्रात अडकलो आहोत, जगाचा आता अंत होणार आहे…. हे चित्र कितीही भयानक असले तरी ते निसर्गाच्या एकाच वेळी त्रिकोणी प्रक्रियांची फक्त एक बाजू आहे….
निर्मितीची क्रिया गुढ मानली जाते… आपण प्रजातीच्या नुकसानाबाबत आपल्या पर्यावरणाच्या नाशाबद्दल दुःखी असताना… निसर्गाची सृजनशक्ती नष्ट होणे अशक्य आहे.. या अद्भुत निसर्गात शाश्वत असं काहीही नाही… परिवर्तन करण्यासाठी नष्ट करावे लागते….
निसर्गात एक शक्तिशाली परिवर्तनीय शक्ती आहे जी पृथ्वीवरील जीवनाच्या कार्यासाठी जबाबदार आहे. मानव जातीच्या उत्कर्षासाठी हे आवश्यक आहे.
निसर्गाच्या या नवनिर्मितीमुळेच नवीन विचार नवीन कल्पना येतात… अशा या निसर्गाशी प्रत्येकाचं नातं घट्ट असतं प्रत्येक सजीव आणि निर्जीव एका अदृश्य धाग्याने या नात्यात बांधले गेले आहेत… वसंतात ते जेवढं घट्ट असतं तेवढं शिशिरातही असतं. प्रभेच्या आगमनाने मोहरणारी पृथ्वी, संध्येच्या मावळण्याने हिरमुसली होती… भर दुपारच्या उन्हात होरपळणारी भूमी, रात्री गारव्याच्या कुशीत निजते…
गारव्यात शहारलेली प्रभा मोत्या प्रमाणे चमकणाऱ्या दवबिंदूंनी स्नान करून.., शिळ वाजवणाऱ्या वाऱ्याच्या संगीतावर धुंद होत… हवेच्या झुळके बरोबर लाजत मुरडत…सोळा शृंगार करून नटलेली सोनप्रभा हळुवार पावलांनी पृथ्वीवर येत आहे… तिचा प्राणसखा डोंगरा आडून तिचे उगवतीचे ओलसर सौंदर्य न्याहाळते…. आपल्या सोनकीरणांनी तो तिला लपेटतो… ती मात्र प्रसन्नतेचे अमृत शिंपण करत राहते.. तिचे सोनेरी रेशमी हात पृथ्वीच्या गळ्यात अडकतात… तिला पृथ्वीचा स्पर्श सुखानंदाचा अनोखा अनुभव देतो… प्रभेच्या स्पर्शाने धुलीकणही मोहरतात… डोंगरही बोलके होतात… उगवतीच्या सोनं किरणात न्हावून निघतात.. उमलणारी फुले बंध पंखुडीतील मधुगंध वाऱ्यावर उधळतात… निसर्गाच्या प्रसन्नतेचे हे विलोभनीय रूप अन्यन्यसाधारण दिसतं…..
पण निसर्गाचे हे सुंदर रम्य असे एकच रूप आहे का…?
नाही..! त्रिमूर्ती निसर्गाचा तीन पैलूंनी सांधलेला त्रिकोण आहे.
ऋतुमानाप्रमाणे निसर्गात होणारे बदल हे मोठे अद्भुत आणि विलक्षण आहेत. ऋतुमानाप्रमाणे होणारी पानगळ, आणि परत येणारी नवी पालवी. एकाच झाडावर एकाच फांदीवर एकीकडे कोवळी गुलाबी लालसर फुट…. तर दुसरीकडे टोकावर जीवन मरणाच्या सीमेवर लढणारी पिवळी पाने… ही पाने अशी की मृत्यूच्या थंड फुंकरीची वाट पाहत असल्यासारखी…. एकाच वेळी नवजन्माचा आनंद… आणि कायमच्या वियोगाचे दुःख अंगा खांद्यावर बाळगणारी ही झाडे खऱ्या अर्थाने निसर्गाची धोतक म्हणावी लागतील.
प्रत्येक झाडाचं वेगळं व्यक्तिमत्व असतं.. उन्हाला सोसणारे, पावसाला झेलणारे, तरीही घटकाभर सावली द्यायला उत्सुक… पक्षांना कवेत घ्यायला तयार… फुलाफळांनी डवरलेल्या फांद्या मोहरलेल्या वाऱ्यावर झुलताना दिसतात… हे सर्व मनाला भुरळ घालणारे असतात…
एरवी आपल्याला मृत्यू माहीत असतो तरी तो उघड्या डोळ्यांनी नाश पावणाऱ्या गोष्टीतून सतत दिसत असतो. गळणाऱ्या पानातून… पक्व होऊन नाश पावणाऱ्या फळात… झडणाऱ्या फुलात… अगदी सगळीकडे… आणि दुसरीकडे निसर्गात दिसणारी कुतूहलाची गोष्ट म्हणजे गळणाऱ्या या पानाफुलांची जागा पुन्हा पुन्हा भरून निघते…. पानन् पान गळून उदास भकास वाटणारे झाड परत हिरव्या कोंबानी भरून जातं आणि कोवळ्या पालवीने बहरून येतं. जाणाऱ्याची जागा येणारा सहज भरून काढतो… ती जागा लगेचच भरून निघते.
हा क्षणभंगी भाव सिद्धांत सांगतो की.. प्रत्येक भाव उत्पन्न झाल्याबरोबर आपल्यासारखा दुसरा निर्माण करतो. आणि दुसऱ्या क्षणी नाश पावत असतो.
विश्वात घडणाऱ्या या निसर्ग नाट्याची माहिती सर्वांनाच असते पण… निसर्ग हे सगळं अगदी सहजपणे स्वीकारतो…
तो जसा घेणारा आहे तसाच तो दाताही आहे. या त्याच्या देण्याच्या प्रक्रियेत झाडं,झुडपं,पाने,फुले,फळे सहभागी होतात. झाडाचे खोड मात्र अविचल असतं… जो पानगळीत मरून गेल्यासारखा वाटतो तो परत नव्याने सर्वांगाने फुलतो… कोवळ्या पोपटी पानांनी बहरतो…
असा हा त्रिमूर्ती निसर्ग… निर्मिती रक्षण आणि नाश अशी तिन्ही कार्य करतो आणि यांनाच ब्रम्हा विष्णू महेश मानले जातात. 🙏🙏
सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
