You are currently viewing कलेक्टर होण्यासाठी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा

कलेक्टर होण्यासाठी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा

यावर्षी आयआरएस झालेल्या मोहिनी खंडारे यांचे प्रतिपादन

कार्यशाळेला अमेरिकेचे चार पाहुणे

 

अमरावती : शहराला लागून असलेल्या वलगाव येथील भव्य अशा सिकची रिसॉर्ट मध्ये श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट आणि मिशन आयएएस यांच्या वतीने एक दिवसाची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व आय ए एस झालेल्या कु.मोहिनी प्रल्हादराव खंडारे यांचा व त्यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिलाताई खंडारे यांचा सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. लेडी गव्हर्नर व सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई ह्या होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कृषी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. गजानन गिरोळकर , नागपूर, आरएसपी अधिकारी श्री सुशांत गायकवाड मिशन आय.ए.एस.चे संचालक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ डॉ. नरेशचंद्र काठोळे अमेरिकेतून आलेले श्री.प्रकाश सिकची , झुबीन सिकची, सौ.प्रीती सोमाणी

आरुष सोमाणी, सुप्रसिद्ध समाजसेवक श्री गोविंद कासटआदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही कार्यशाळा दुपारी चार वाजता संपली. या कार्यशाळेची सुरुवात सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन मालकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना नव्यानेच आयएएस झालेल्या कु. मोहिनी प्रल्हादराव खंडारे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जीवनापासूनच करायला पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी शिकत असताना वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन आपले व्यक्तिमत्व तत्पर तेजस्वी व तपस्वी बनविले पाहिजे यावर भर दिला .त्यापुढे त्या अशाही म्हणाल्या की तुमची बेसिक तयारी चांगली असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वारंवार वाचून आपला पाया पक्का केला पाहिजे. अगोदर आयएएस या परीक्षेविषयी जनजागृती नव्हती. पण मिशन आयएएसने व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यामुळे आता महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आयएएस होत आहेत. विद्यार्थ्यांनी खचून न जाता सतत चांगल्या मार्गदर्शकाच्या सहवासात राहिले तर आयएएस सारख्या परीक्षेतही सहज उत्तीर्ण होता येते. मी स्वतः पुसद सारख्या ग्रामीण भागात राहून हे यश संपादन केलेआहे .भविष्यातही जी मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करतील त्यांच्यासाठी मी पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे

 

या कार्यशाळेचे दुसरे मार्गदर्शक आरएसपी अधिकारी श्री सुशांत गायकवाड यांनी मुलांना त्यांच्यामध्ये जाऊन बोलके केले .स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास कसा महत्त्वाचा आहे आणि तो कसा करावा हा भाग त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समजावून सांगितला. या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या सर्वांचा मा.लेडी गव्हर्नर मातोश्री कमलताई गवई यांच्या हस्ते वृक्ष रोपटे देऊन सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात अध्यक्षपदावरून बोलताना लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांनी सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांचे व्यक्तिमत्व कसे घडले ते मराठी माध्यमातून कसे शिकले .त्यांचे स्वतःचे शालेय जीवनात असलेल्या ग्रंथालय त्यांनी कसे डेव्हलप केले याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

 

सकाळपासून सातत्याने पाऊस असूनही सिकची ट्रस्टचे अनिस मिर्झा, गजाननदादा कडू , रामचंद्रजी निर्मळ प्रायमरी व प्रेमकिशोर सिकची हायस्कुलच्या मुख्याध्यापीका मनिषाताई निर्मळ, मनोजदादा निर्मळ श्रीकांत कुकडे चंद्रशेखर आसोले ईश्वरी भालचक्र आणि एस.एल

हायस्कुल, व्यंकटराव निर्मळ हायस्कूल, उर्दू हायस्कूल यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे ही स्पर्धा परीक्षा कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली . मुलांना नेण्यासाठी आज माजी राष्ट्रपतीं श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे माजी खाजगी सचिव व अमरावतीचे माजी जिल्हाधिकारी श्री रवींद्र जाधव यांचा स्मृतिदिन असल्यामुळे त्यांच्या परिवारातर्फे श्री सिद्धार्थ ठोके यांनी मुलांना जाण्यासाठी ट्रॅव्हल्स उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचप्रमाणे या स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रशिक्षक कु. मोहिनी प्रल्हादराव खंडारे ह्या या कार्यक्रमासाठी निघाल्या असताना त्यांना दोन ठिकाणी पुलावरून पाणी वाहताना दिसल्यामुळे त्यांनी दोन वेगवेगळ्या रस्त्याने येऊन आपली स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी किती आपुलकी आहे हे सिद्ध करून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन सौ.सिमाताई पाखरे यांनी केले तर श्री.असवार यांच्या आभाराने स्पर्धा परीक्षा कार्यशाळा या कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांचा व सर्व अध्यापकांचा मोमेंटो व बुके देऊन सत्कार करण्यात आला .तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. बाहेर एवढा पाऊस असूनही विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली होती.

==============

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा