*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम लेख*
*शिष्यावीण गुरु असंभव*
डोळे बंद करून पाहून बघा. वेडाच आहे म्हणेल कुणी, पण हे त्यांचे अज्ञान आहे. कारण बंद डोळ्यांचे विश्व अथांग आहे.
कुणीतरी पुन्हा म्हणाला, ” बाबारे! राहू दे तुझं ते बंद डोळ्यांचे अपार विश्व. अरे उघड्या डोळ्यांनी चालतांना धडपडतो आपण आणि धडाचा चुराडा होऊन अथवा जग सोडून जाणाऱ्या लोकांपैकी आम्ही. आम्हाला ह्या कसल्या भूलथाप जगाची भुरळ घालतोस ? ”
मी म्हणालो, ” हा अज्ञात ज्ञान प्रताप
ही भुरळ न, न भूलथाप |
भासे जणु डोक्यास ताप
परि भावार्थ जाण अमाप || ”
आणि एक व्यास भेटला. अंधाऱ्या मार्गांवर प्रकाशणारा सूर्य. बंद डोळ्यांना तेज देणारा आणि अंधारात सत्य प्रगट करणारा तेजस्वी सामान्यातही स्वजाणीव निर्माण करणारा, अज्ञान अंधार नाहीसा करणारा गुरु. ज्ञान सागरात तारणारा, सत्यार्थ प्रकाशणारा तेजोनिधी ज्ञानसूर्य.
आषाढ पौर्णिमा एका महान तपस्व्याचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत गुरुला अत्यंत महत्वपूर्ण आणि शिरोधार्य स्थान आहे.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर :
गुरुर्साक्षात पर:ब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ||
हे असं स्थान असलेली ज्ञान महर्षी व्यक्ती म्हणजेच वेद व्यास महंत यांचा आज जन्मदिन गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतो. ही व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. हिंदू धर्मात वेद हे देव निर्मित मानले जातात परंतु त्यांचे संकलन करुन चार वेदांत (ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद)वर्गीकरण मात्र वेद व्यास यांनी केले असे मानले जाते. महाभारत, अठरा महा पुराणे अठरा उपपुराणे त्यांनी लिहिली असे मानले जाते याच महर्षींना कृष्ण द्वैपायन असेही संबोधतात.
जीवन तत्वज्ञानात
ही महाभारत कथा
अठराही पुराणात
उत्तुंग जीवन गाथा ||
असं अतुल्य, अमूल्य अगाध जीवन अमृत ज्ञान सरिता सकळ मानव जातीस प्राप्त करुन देणाऱ्या या महान गुरु देवाचे चिरंतन स्मरण व्हावे यासाठीच गुरु शिष्य परंपरा निर्माण केली. हिंदू परंपरेचा हा सन्मान आहे.यावेळी गुरु पुजन केले जाते. खरं यात गुरु आणि शिष्य दोघेही एकमेकांचा आदर करतात. गुरुंचा प्रेमळपणा आणि ज्ञानच शिष्याच्या विकासाला कारणीभूत ठरतात. असे असावे हे दोन ब्रम्ह एकरुप.
शिष्य जाता पुढे
नसो खेद मनी |
नको अहंकार
गुणी शिष्या जनी ||
कुणी न येथे लहानसान प्रत्येक आहे थोर. त्याला प्रकाशात आणण्यासाठी विकासाच्या योग्य वाटेला लावणारा, जीवनाचा उत्कर्ष साधून देणारा गुरु लाभावा लागतो. तो स्वार्थापायी वा अहंकारापायी वाट लावणारा नसावा. आजच्या काळाचा विचार करता गुरु आजही तितकाच महत्वाचा आहे सत्य युगात, त्रेता युगात होता.
गुरु काल, आज आणि उद्या सकाळी
भूत, वर्तमान आणि भविष्यकाळी |
जीवन नंदनवनाचा तो माळी
सौंदर्यसुंदर आकार दे सुकाळी ||१||
साफल्य शिष्योत्तम ध्येय गुरु पाळी
मतभेद नसे ज्ञानदानी अवेळी |
तेव्हा शिष्य ही नम्र आचरण पाळी
गुरु समाधानी त्या कर्तृत्वावेळी ||२||
शाळा, महाविद्यालये आणिक सर्व शिक्षण संस्था प्रत्येक क्षेत्रातील या सर्व गुरुंना विनम्र अभिवादनासह त्यांच्या सर्वोत्तम यशासाठी अपरिमित शुभेच्छा! तसेच प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या शिष्योत्तमांनाही त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनंतरुपी अनंत शुभेच्छा!
धन्यवाद
गुरुप्रिय शुभेच्छुक
लेखक,कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता. वेंगुर्ला,
जि. सिंधुदुर्ग, राज्य-महाराष्ट्र.

