You are currently viewing तुमचा माझा विठ्ठल गेला…

तुमचा माझा विठ्ठल गेला…

*कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखा सदस्य कवी विजयकुमार शिंदे लिखित गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांना अभिवाद पर रचना*

 

*तुमचा माझा विठ्ठल गेला …*

 

आषाढाच्या पहिल्या दिवशी अश्रूंचा आला पूर

तुमचा माझा विठ्ठल गेला सोडुनिया पंढरपूर

 

कसा अचानक आला घाला

अन् तुळशीची तुटली माला

उरी दु:खाचा रुतला भाला

प्राजक्ताच्या झाडावर का झाली नियती निष्ठूर?

तुमचा माझा विठ्ठल गेला सोडुनिया पंढरपूर

 

त्या देवाची मधुर वाणी

भक्तच सारे शत्रू न कोणी

म्हणूनी निर्वाणाच्या त्या क्षणी

पाऊस रडला, देत हुंदके वाराही गेला दूर

तुमचा माझा विठ्ठल गेला सोडुनिया पंढरपूर

 

गझल तयाची असे स्वामिनी

हास्य सदाचे विलसे वदनी

थोर जरी तरी ना अभिमानी

गझल प्रांतीचा ध्रुव तारा तो माझ्या कवितेचा सूर

तुमचा माझा विठ्ठल गेला सोडुनिया पंढरपूर

 

जाणे त्याचे कसे पटावे?

ॠण तयाचे कसे फिटावे?

दु:ख उरीचे कसे हटावे?

असा अचानक सूर दूर जाता मैफिल झाली बेसूर

तुमचा माझा विठ्ठल गेला सोडुनिया पंढरपूर

 

अभिवादन दोन्ही जोडुनी कर

स्मृती मनी राहील निरंतर

डोळ्यांतून जल वाहे झरझर

भक्तांच्या जीवनी देवाविन सदैव राहे निपूर

तुमचा माझा विठ्ठल गेला सोडुनिया पंढरपूर

 

— विजयकुमार शिंदे

कणकवली

प्रतिक्रिया व्यक्त करा