*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा पल्लवी उमरे लिखित अप्रतिम लेख*
*गुरूपोर्णिमा*
गुरूरब्रम्हा गुरूरब्रम्हा विष्णू
गुरूरदेवो महेश्वरा,गुरू साक्षात परब्रह्म
तस्मे श्री गुरूवेन महा…
प्राचिन काळापासून आजतागायत गुरू शिष्य परंपरा चालत आलेली आहे. आपण जीवनात गुरूकडून काही ना काही शिकत असतो, किंबहुना गुरूलाच जीवनाचा पथदर्शक, मार्गदर्शक मानले आहे.
*गुरूविना मती नाही
*गुरूविना गती नाही
गुरूशिवाय जीवनाला पूर्णता नाही.
म्हणून या गुरूजनांप्रती आदर, कृतज्ञता मानसन्मान व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढातली शुक्ल पक्षातील पोर्णिमा.
ही तिथी गुरू पोर्णिमा म्हणून साजरी केली
जाते. गुरूपुढे नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा… गुरूपुजन करून पाद्यपूजा करण्याचा हा दिवस. जन्मापासून किंबहुना मातेच्या गर्भात असल्यापासून माता हिच आपला प्रथम गुरू असते. गर्भातूनच ती आपल्या लेकरावर संस्कार करत असते. खरतर गर्भसंस्कार मातेच्या उदरातूनच होत असतात.
जिजाऊंनी शिवबावर गर्भातूनच संस्कार
करीत राज्यकारभाराचे बाळकडू दिले.
शिवाजी महाराजांनी दादाजी कोंडदेवांना
आपले गुरू मानून शस्त्रविद्या ग्रहण केली.
चक्रव्यूह भेदण्याची कला सुभद्रेने अभिमन्यूला अभिमन्यू पोटात असतानाच दिली. सितेने वाल्मिकी ऋषींच्या सानिध्यात राहून लवकुशांवर योग्य संस्कार केले. गुरू द्रोणाचार्य पांडवांचे आणि कौरवांचे गुरू होते.
रामायण महाभारतातील स्त्रियासुद्धा लेकरांना शुरयोद्धयाच्या कथा सांगायच्या. तर सांगायचे तात्पर्य मुलांचा पहिला गुरू आई असते ,त्यानंतर वडील. जे आपल्यावर लहानपणापासूनच संस्कार घडवतात. नंतर शाळेत गेल्यावर गुरूजनांकडुन विद्येचे धडे मिळतात.
मराठी, संस्कृत, गणित इतिहास भूगोल, विज्ञान इ. विषयाचे ज्ञान शाळेतच प्राप्त होते. समाजात वावरताना कळत नकळत कुणी ना कुणी काहीतरी शिकवून जात असतं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला विद्या देणारे सर्व आपले गुरूच असतात. आणि ज्याला आपण गुरूस्थानी मानतो, तो खऱ्या अर्थाने जीवनाला कलाटणी देणारा मार्गदर्शक असतो. मग तो अध्यात्मिक गुरू का असेना. शिक्षकही आपले गुरूच असतात. जे आपल्याला शिक्षणाची विषयाची गोडी लावतात.
ज्ञानरूपी मौक्तिकांची ओंजळ, आजन्म पुरून उरणारे ज्ञान शिष्यांच्या झोळीत टाकणारे आद्यगुरू, योग्य ते संस्कार करून एक चांगला माणूस घडविण्याचे काम गुरू करतात. म्हणून गुरूंचे स्थान पूजनीय असते.
जीवनाचं खरं तत्वज्ञान सांगणारे अध्यात्मिक गुरू, जीवनाचं सार सांगतात.
गुरू व्यासांनी चार वेदांची महती सांगितली.
वेद, उपनिषदांचे ज्ञान दीले. महाभारताचे रचयिता महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस गुरूपोर्णिमा म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच गुरूपोर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हणतात.आदर्श जीवनाचा पाठ शिकवणारे गुरूच असतात. म्हणूनच गुरूचे स्थान जीवनात अनन्यसाधारण आहे.
गुरू हाच जीवनाचा खरा मार्गदर्शक असतो. मोहवासनेपासून परावृत्त करून, परमात्म्याला शरण जावे, विषयवासना विकारावर विजय मिळवून अध्यात्माकडे वळावे. असे जीवनाचे सारं सांगणारे ही गुरूच असतात. पुर्वीच्या काळी म्हणूनच
गुरूकुले अस्तित्वात होती.राजे महाराज्यांची
मुले जाणत्या वयापासून आपल्या मुलांना
ज्ञान ग्रहण करण्यासाठी गुरूकुल मधे पाठवत असत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेतुन लोकांना ज्ञानामृत देऊन गेले.
*गुरूदेव हमारा प्यारा… है जीवन का उजियारा*… अनेक संतमहात्म्यांंनी गुरूचा महीमा सुंदर वर्णन केला आहे. संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, चांगदेव या सर्वांनी गुरू महीमा आपल्या संत साहित्यातून वर्णन केला आहे.ऋषी वशिष्ठ रामाचे गुरू होते.अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला गुरू मानले होते.सांदिपनी ऋषी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाचे गुरू होते.गुरू द्रोणाचार्य पांडवांचे गुरू होते.गुरू शुक्राचार्य कौरवांचे गुरू होते.एकलव्याने तर गुरू द्रोणाचार्य ना आपला गुरू मानून त्यांचा पुतळा उभारून धनुर्विद्या ग्रहण केली होती. अशा प्रकारे पुर्वापार चालत आलेली गुरुशिष्य परंपरा हा हिंदू संस्कृतीचा गाभा आहे. म्हणूनच गुरूला अनन्य साधारण महत्त्व आहे.
“गुरूविना ज्ञान कहाॅं, गुरूविना कहाॅं सम्मान… गुरूविना कहाॅं पहचान”
त्यासाठीच गुरू पोर्णिमेला *गुरूपुजनाची* परंपरा आहे. मला जीवनात ज्यांनी ज्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्या सर्व गुरूंना आजच्या गुरू पोर्णिमेच्या दिवशी त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा.
©®शब्दवैभवी पल्लवी उमरे

