अपील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी भूमि लोक अदालतचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय सिंधुदुर्ग येथे मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी सुजितकुमार जाधोर यांच्या अध्यक्षतेखाली भूमि लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांचे अधिनस्त उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील जमिन मोजणी प्रकरणे, फेरफार नोंदीची प्रकरणे, एकत्रीकरण योजनेमधील चूक दुरुस्तीची प्रकरण, व कार्यालयीन इतर तक्रारी अर्जाबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुध्द किंवा केलेल्या कार्यवाहीविरुध्द कार्यालयात अपील प्रकरणे प्राप्त होत आहेत. या अपील प्रकरणात कार्यालयाकडून सुनावणीची कार्यवाही पूर्ण होऊन निर्णय पारीत होईपर्यंत जनतेचा वेळ, पैसा व श्रम खर्ची होवूनही पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे अपील प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी भूमि लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांच्याकडे दाखल अपील प्रकरणात दोन्ही पक्षकार स्वयंप्रेरणेने अथवा विधिज्ञ यांच्यामार्फत समझोता अथवा तडजोड करण्यास तयार असल्यास त्यांनी तसा लेखी अर्ज जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयास सादर करावा. असे अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही होऊन प्रस्तुत दावे विनाविलंब निकाली होणार आहेत. त्यामुळे पक्षकार यांचे आप आपसातील वाद संपुष्टात येतील व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमध्ये सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यास मदत होईल. प्रलंबित अपिलांचा झटपट निर्णय लागल्याने तोंडी युक्तीवाद, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातील. तसेच दोन्ही पक्षकर यांचा वेळ व पैसा याची बचत होवून उभय पक्षकारांचे समाधान होईल. त्यामुळे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांचे कार्यालयाकडे जनतेच्या तक्रारी कमी होऊन प्रशासकीय कामात सुलभता येवून जनतेचे जीवनमान सुकर होणार आहे.
