साळगाव :
जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स (हॉटेल मॅनेजमेंट), साळगाव येथे बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी चे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हॉटेल इंडस्ट्रीची ओळख करून देणे व अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास तरुण भारत दैनिक सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक व जयहिंद ग्रामोन्नती संस्थेचे खजिनदार श्री. शेखर सामंत, लोकमान्य एज्युकेशन कोकण विभागाचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभूकेळुसकर, शेफ गिरीश फटनाईक , जय हिंद कॉलेजचे प्राचार्य मान. अमेय महाजन आणि पी.आर.डी. अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर शारभिद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. शेखर सामंत म्हणाले, “विद्यार्थ्यांनी ध्येय आणि चिकाटीने मेहनत घेतली तर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचतारांकित हॉटेल्स सुरू होत आहेत. भविष्यात पर्यटन उद्योगाची वाढ होईल, त्यामुळे केवळ नोकरीच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळेल.”
प्रवीण प्रभूकेळुसकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित शिक्षणाला दिलेले महत्त्व स्पष्ट करत सांगितले, “विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देऊन त्यांना सक्षम बनवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला एकही विद्यार्थी नोकरीशिवाय राहणार नाही, ही आमची जबाबदारी असेल,” अशी हमी त्यांनी दिली.
जय हिंद कॉलेजचे प्राचार्य मान. अमेय महाजन व बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मयूर शारभिद्रे यांनी देखील विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक प्रा. ऋषिकेश सूर्याजी सर यांच्या मनोगताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षद धुरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. मनाली सावंत यांनी केले.
तृतीय व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रतिसादातून कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसून आले. जयहिंद कॉलेजने ग्रामीण भागात अल्प फीमध्ये दर्जेदार हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण देत कौशल्याभिमुख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची परंपरा यानिमित्त टिकवून ठेवली आहे.

