You are currently viewing दिंडी निघाली

दिंडी निघाली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*दिंडी निघाली*

 

आज ६ जुलै २०२५ रविवार ! आज आषाढी एकादशी आहे. हिलाच देवशयनी एकादशी असेही म्हणतात. देव म्हणजे विष्णू शयनी म्हणजे झोपलेला ! हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देव( विष्णू) झोपतात — योग निद्रेत जातात. या दिवसापासून पुढे कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चार महिने भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर विश्रांती घेतातअसतात . योगनिद्रेत असतात. या चार महिन्याच्या कालावधीलाच चातुर्मास असे म्हणतात.ह्या चार महिन्यात अनेक व्रते उपासना केल्याजातात.देव जरी झोपलेले असले तरी उपासकांनी उपासना करावी. अध्यात्मिक उन्नती करावी असे मानले जाते कारण उपासनेने आत्मिक शुद्धता होते मन ईश्वर चरणी लीन होते ह्या काळात कोणतेही शुभ कार्य उदा लग्न, वास्तू शांती ,उपनयन करीत नाहीत. कारण चार महिन्यात देव उपस्थित नसतात आराम करीत असतात अशी भावना आहे. भगवान विष्णू आराम करीत असतांना भक्तांनी नामजप, उपवास व्रते करावी असे समजले जाते . विठोबाशी एकरूप व्हावे त्याचे गुणगान करावे या उद्देशाने ईश्वरभक्ती केली जाते आषाढी एकादशीला देव झोपणार! त्याआधी त्याची भेट घ्यावी म्हणून लाखोंच्या संख्येने भक्त पंढरपूरला निघतात. सर्व वयोगटाचे विठ्ठल प्रेमी सावळ्या विठाईला भेटण्यासाठी निघतात. ही केवळ यात्रा नाही तर भक्ती, प्रेम विठ्ठलभेटीची ओढ असते दिंडी म्हणजे विठ्ठलभक्तीने भारलेले एक छोटे पथक! “यात सर्व वयोगटाचे स्त्री पुरुष लहान मुले असतात .पथकाचा एकभगवा झेंडा असतो टाळकरी वीणा वादक असतात कुणाच्या हातात ढोल असतात .काही जण भजन करणारे असतात .काही स्त्रियाच्या डोक्यावर छोटेसे तुळशी वृंदावन असते. अतिशय उत्साहाने हे सर्वजण पंढरपूरला पायी निघाले असतात. एकमेकांमध्ये सहकार्याची, आपुलकीची भावना असते अशा अनेक दिंड्या वेगवेगळ्या गावातून निघतात पंढरपूरची वारी मुख्यतः दोन पालख्यामुळे प्रसिद्ध आहे. एक संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीहून व संत तुकाराममहाराजांची देहूहून ! शिवाय अक्कल कोट, शिर्डी शेगाव आशा अनेक देवस्थानातून , गावोगावातूनही दिंडीपालखी निघते अनेक गावाहून येणाऱ्या दिंड्या ज्ञानदेव तुकाराम चा जयघीष करीत ह्या अफाट जनसागरात मिसळून जातात. पालख्या फुलांनी सजविलेल्या असतात! पालख्याच्यामागे असलेल्या दिंड्यांना नंबर दिलेले असतात,आळंदीहून ज्ञानोबामाऊली तुकाराम च्या गजरात जेंव्हा पालखी निघते तेंव्हा त्यांच्या मंदिराचा कळस क्षणभर हालतो. हजारो, लाखो लोक हे दृश्य पाहण्यासाठी आतुरलेले असतात. वाटेत अनेक गावे शहरे पार करीत कधी उन्ह कधी पावसात भिजत दिंडी चाललेली असते प्रत्येकाच्या तोंडी माऊली माऊली चा उदघोष सुरू असतो मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असतात रोज नामस्मरण भजन कीर्तन करीत दिंडी पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत असते कुणीही नाराज, रागावलेला नसतो सगळ्यांचे ध्येय एकच! विठू माउलीला भेटणे! वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिंगण सोहळा! रिंगण कुठे असणार ही ठिकाणे ठरलेली असतात .हा सोहळा पाहण्यासाठी दुरदुरून लोक येतात रिंगण म्हणजे भक्तीचा सोहळा! संतांचे स्मरण शिस्त व एकात्मता याचे प्रतीक! एका खुल्या मैदानात एक सजविलेला अश्व सोडला जातो काही वेळा अश्वावर घोडेस्वार सुद्धा असतो. घोड्याने रिंगण घालणे सुरू केले की त्याच्यामागे झेंडा घेतलेले वारकरी,टाळकरी मृदंग वादक , तंबोरा वादक, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या सर्व वयोगटाच्या स्त्रिया पळतात .हा अनुपम सोहळा पाहणे भाग्यवान लोकांच्याच भाग्यात असते

रात्रीच्या विसाव्याच्या जागा ठरलेल्या असतात वारकरीच्या भोजन निवासाची ठिकाणेही ठरलेली असतात! स्त्री पुरुष गरिब श्रीमंत हा भेदभाव नसतो.प्रत्येकाला माऊली म्हणून आदर दिला जातो .या वारकऱ्यांची सेवा घडावी म्हणून अनेक सेवाभावी संस्था अहोरात्र झटत असतात . वेगवेगळ्या सेवा वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात .औषधपुरवठा विनामूल्य असतो कुणी त्यांच्या जेवण्याची व्यवस्था करतात कुणी चहा, सरबत फराळाची पाकिटे ,केळी वाटत असतात. पाण्याच्या बाटल्या पुरविल्या जातात. एव्हढेच नाही तर चालून चालून थकलेल्या वारकऱ्यांचे पाय ही तेल लावून चोळून दिले जातात. ज्याला जमेल तशी प्रत्येक जण मदतकरीत असतो. कुठलेही प्रशासन नसतांना हा वारी सोहळा जवळपास ३४० वर्षांपासून सुरू आहे कुठेही चेंगराचेंगरी नाही आरडाओरडा नाही अश्लील ता नाही .लहान मोठा स्त्री पुरुष प्रत्येकाला आदराने माऊली म्हटले जाते या वर्षीच्या वारीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे पूजा काळे या मुलीने वारीच्या रस्त्यावर ३४० रांगोळ्या काढण्याचा विश्वविक्रम केला आहे इतरही बरेच जण वारीमार्गावर वारकऱ्यांचे स्वागत रांगोळ्या काढून करत आहेत पंढरीनाथ महाराज की जय च्या जयघोषात पंढरीच्या दिशेने ! विठ्ठल विठ्ठल हा एकच ध्यास घेऊन ऊन वारा पावसाची फिकीर न करता दिंडी पुढे जात असते नामघोष सुरू असतो विठोबा निद्रिस्त होण्याआधी त्याचे दर्शन घ्यायचे आहे काही विठू वेडे तर चार महिने पंढरपूरात ठाण मांडून बसतात देव उठण्याची वाट पाहतात भेटी लागी जीवा, लागलीसे आस ही व्याकुळ स्थिती आता लवकरच संपणार आहे ज्या क्षणाची वारकरी आतुरतेनेने वाट तो क्षण येतो। पंढरपूरच्या विठोबाच्या मंदीराचा कळस दिसू लागतो प्रवासाचा सारा थकवा निघून जातो। वारकरी उत्साहाने विठू नामाचा गजर करू लागतो आनंदाने कुणी फुगड्या खेळू लागते कुणी टाळ मृदगाच्या तालावर फेर धरून नाचू लागतात लाखो लोकांचा हा जनसागर आपल्या अंतिम ध्येयापर्यंत येऊन पोहचलेला असतो मंदिराचा कळस तिथला परिसर चंद्रभागा हे सर्व पाहून देहभान विसरून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी च्या नादात अवघे पंढरपूर स्वतःला विसरलेले असते

राम म्हणजे आनंदी , समाधानी शांत वृत्ती! कृष्ण म्हणजे सर्वांना आकर्षित करणारा प्रेम, करणारा करुणामय वृत्तीचा! आणि हरी म्हणजे हरण करणारा! पाप दुःख, अज्ञान दूर करणारा! आनंद प्रेम व मोक्ष तिन्हीचा अपूर्व संगम!

चला तर आपणही म्हणू या

चंद्रभागेच्या तीरी , उभा श्रीहरी

तो पहा हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी .

 

राम कृष्ण हरी।

जय जय राम कृष्ण हरी

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा