You are currently viewing वारी..एक चिंतन

वारी..एक चिंतन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*

 

*वारी..एक चिंतन*

 

वर्षानुवर्षे अव्याहतपणे चालत आलेली महाराष्ट्राची एक गौरवशाली परंपरा म्हणजे वारी…!

 

*स्वल्प वाटे चला जाऊ | वाचे गाऊ विठ्ठल ||*

*तुम्ही आम्ही खेळमेळी | गदारोळी आनंदे ||*

 

असे आवाहन करताना संत तुकाराम महाराजांनी परमार्थ हा वैयक्तिक नसून सामूहिक आहे.. वारी ही अनेकांनी एकत्र मिळून करायची असते.. असे सांगितले आहे. यासाठीच त्यांनी म्हटले आहे…

*”एकमेकां साह्य करू | अवघे धरू सुपंथ ||”*

वारी म्हणजे केवळ सर्वांनी एकत्र जमून चालत पंढरीला जाणे नव्हे तर ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची सर्वश्रेष्ठ संधी आहे. त्यासाठी विशिष्ट तिथीला इष्टदेवतांकडे जाणे म्हणजे वारी. दिंडीसोबत विठुरायाचा गजर करत जाणे अन् “याची देही याची डोळा” विठुरायाचे दर्शन घेणे म्हणजे वारी..

वैष्णवांचा मेळा..भक्तांचा महासागर..समानतेचा संदेश.. कपाळी टिळा..गळ्यात तुळशी माळा..अन् मुखी हरिनाम.. देहभान विसरून भक्तीत रममाण होणे म्हणजे वारी..! वारी म्हणजे केवळ विटेवर उभ्या विठ्ठलाचे दर्शन घेणे नव्हे तर भक्तिभाव, साधना, संतांचे स्मरण आणि समानतेचा संदेश पसरविणे.. म्हणून तर वारीत सर्व जाती धर्माचे वारकरी देहभान विसरून नाचत खेळत हर्षानंदे पंढरीस जातात.. त्यासाठीच तुकोबा म्हणतात..

*नाचत जाऊ याच्या गावा रे खेळिया | सुख देईल विसावा रे ||*

विठ्ठलाचे हे गाव म्हणजेच पंढरपूर..!

 

वारी करणे म्हणजे फक्त स्वहित चिंतीने नव्हे तर चिंतन करणे.. मनुष्य जन्म मिळाला त्याचे सार्थक करण्यासाठीच असते ती वारी..आणि मनुष्य जन्म कोणाला नको आहे..? हाच मनुष्य जन्म वारंवार मिळण्यासाठी, देहभान विसरून ईश्वर भक्तीत रमण्यासाठी वारीत चालणारा वारकरी विठ्ठलाकडे अभंगातून एकच मागणे मागत असतो..

 

*हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा |*

*गुण गाईन आवडी | हीच माझी सर्व जोडी |*

 

वारी करणे म्हणजे इच्छित साध्य होणे नाही. वारीत चालताना वारकऱ्यांच्या मनातील भावना शुद्ध भक्तीने ओतप्रोत भरलेल्या अन् ईश्वर चरणी लीन होण्याच्या असल्या पाहिजेत. शरीराला क्लेश देऊन लाड करून भोग घ्यायचे नाहीत. तरच वारी करणारा वारकरी ईश्वरी प्रेमाचा अधिकारी आणि वाटेकरी होतो. वारकऱ्यांची वेगवेगळी वेशभूषा, हाती टाळ मृदंग, मुखात अखंड हरिनाम, अभंग गात अन् फुगडी, रिंगण सारखे डोळ्यांचे पारणे फेडणारे सोहळे करत दिंडी लोकनृत्य आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करीत पंढरीच्या वाटेवर प्रस्थान करते तेव्हा विठ्ठलाच्या गजराचा कर्णमधुर नाद नभांगणी घुमतो..पाऊले थिरकतात..वायुवेगे दोन्ही अश्व दौडत असतात..अन् तो शिस्तबद्ध, अलौकिक, अतिवसुंदर, भक्तीने भारलेला अविश्वसनीय रिंगणसोहळा, भक्तीचा मेळा डोळ्यांत विठ्ठलाच्या प्रती विलक्षण आसक्ती निर्माण करतो.. मनाला लागलेली विठ्ठल भेटीची आस अतिव तीव्र करतो.. विठ्ठल भक्तीच्या, प्रेमाच्या ओढीने न थकता पाऊलांना पंढरीच्या वाटेवर अलगद नकळत घेऊन जातो..

 

पालखीतील संतांच्या पादुका म्हणजे वारीचे सौंदर्य.. सर्वार्थाने लीन होण्याचे एक पवित्र्य स्थान!

*”बाप रखुमादेवी विठ्ठलाचा वारेकरु”* ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली वारीची व्याख्या. पूर्वी ज्ञानेश्वर माऊली अन् तुकाराम महाराजांच्या पादुका दिंडीने एकत्र पंढरपुरास निघायच्या. त्यावेळी *ज्ञानबा तुकाराम* हे शब्द प्रत्येकाच्या मुखातून वदले जायचे..आजही ज्ञानबा तुकारामाचा गजर अव्याहतपणे होत असतो. हळूहळू दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून पंढरपुरी येऊ लागल्या. परंतु उत्साह, भक्तिरस अन् सोहळा मात्र तसाच सुरू राहिला. देहू असो की आळंदी पालख्यांचे अंतिम ठिकाण म्हणजे पंढरपूर..! पंढरपूरचा हा विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण..! पुंडलिकाच्या भेटीस आलेल्या श्रीकृष्णाला पुंडलिकाने वाट पाहत विटेवर उभे करून ठेवले..तोच *”कटेवरी हात उभा विटेवरी”* असा विठ्ठल..!

 

पंढरपुरी चालत जाणारी वारी म्हणजे शिस्तीचा अत्युत्तम नमुना..! रस्त्याने न थकता चालण्याची जिद्द, रीत, वारीतील शिस्त, एकमेकांप्रती असलेला स्नेहभाव, आदरभाव.. विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलावर प्रेम व्यक्त करण्याचा त्यांचा मार्ग सर्वकाही वाखाणण्याजोगे..! विठ्ठलाच्या पंढरपुरी वारीत लाखो लोक एकत्र येतात, एकत्र प्रवास करतात त्यामुळे सामुदायिक भक्तिभाव, भावना आणि बंधुभाव वाढीस लागतो.. वारी जिथे विसावते तिथे कोणी जाती धर्म पाहत नाहीत. *”सेवा हाची असे धर्म, भक्ती हीच माझी जात”* समजून कुणी जेवणाची सेवा देते, कुणी पाणी पाजून तृष्णा भागवते.. सर्वधर्मसमभाव तिथेच तर जन्म घेतो. वारकऱ्यांनी एकमेकांना उद्देशून वापरलेला *”माऊली”* हा शब्द एकमेकांबद्दल विलक्षण प्रेम, आदरभाव जागृत करतो… म्हणून तर वारी ही केवळ भक्तीरूपाने चाललेली यात्रा नसून एक मोठी धार्मिक परंपरा आहे.

पंढरपूरच्या वारीत भक्ती, समरसता आणि सामुदायिक भावना यांचा अनुभव मिळतो. वारीत जगण्याचा अर्थ उमगतो.. प्रेम अन् शांतीचा संगम पहायला मिळतो.. संयम, सहनशीलता, माणुसकी, समजूतदारपणा शिकायला मिळतो.. श्रद्धा अन् भक्ती, आनंद आणि उत्साहाचा स्रोत ज्ञात होतो.. एकदा का स्वतःला विसरून केवळ विठ्ठलाला स्मरून वारी करून कुणीही परतला की, प्रत्येक वारकऱ्याला जगण्यासाठी नवीन ऊर्जा अन् सकारात्मक दृष्टीकोन मिळतो.. जीवनाचे खरे फलित म्हणजे आणखी काय असते..?

…म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात *”अवघाचि संसार सुखाचा” करण्याचा मार्ग म्हणजे वारी..!*

ही वारी करीत असताना विठ्ठलाकडून वारकऱ्यांची कोणतीही अपेक्षा नसते, त्यांना आस लागलेली असते ती केवळ त्याच्या दर्शनाची अन् प्रेमाची… आणि हीच प्रेमाची शिदोरी विठ्ठल माऊली कडून घेण्यासाठी वारकऱ्यांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात…

“तुम्ही चंद्रभागेच्या तीरावर मोर्चेबांधणी करा, पंढरीस वेढा घाला..विठ्ठलाला आत कोंडून ठेवा..”

*”वेढा वेढा रे पंढरी | मोर्चे लावा भीमा तीरी ||”*

 

आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी वारी करावीच..

कारण.. कुणालाही सहज उमगत नाही वारी.. वारी म्हणजे चिंता नव्हे तर चिंतन असते आयुष्याचे..मानव जन्माचे..!

कुणी आपले कर्तव्य, कर्म समजतो वारी.. कुणी मातापित्याची सेवा म्हणजेच म्हणतो वारी..कुणी शिवारातील धरणीची सेवा म्हणतो वारी..कुणी म्हणतो वारी म्हणजे कुणीही उपाशीपोटी जाऊ नये द्वारी.

*|| रामकृष्ण हरि | रामकृष्ण हरि ||*

 

🖋️दीपक पटेकर दीपी

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

#८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा