झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील बालकांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप..
सावंतवाडी : मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम मल्लसम्राट करीत आहे. आज खऱ्या अर्थाने युवकांना चांगली दिशा यातून मिळत असून प्रतिष्ठांच्या माध्यमातून सतत भरीव सामाजिक कार्यदेखील घडत आहे घडत आहे. मल्लसम्राटच्या या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी काढले. मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने जीवदान विशेष शाळा झाराप (मतिमंद प्रवर्ग) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख होते. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद धुरी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब, मल्लसम्राटचे सचिव ललित हरमलकर, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सहसेक्रेटरी फिजा मकानदार, निरवडे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव, पीआरओ साबाजी परब, तसेच ह्युमन राईट वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद कांडरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील नेवगी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रोजम्मा जोब आदि उपस्थित होते.
दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते विशेष बालकांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले तसेच मल्लसम्राट प्रतिष्ठानचे सदस्य नागेश सूर्यवंशी व कामाक्षी महालकर यांचा वाढदिवस विशेष बालकांसोबत केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या आज खऱ्या अर्थाने या विशेष बालकांसोबत काही क्षण साजरा करता आले, यासारखा परमानंद नाही. भगवंताने या बालकांना काहीतरी कमी दिलं असे नाही तर त्यांना ते विशेष दिले आहे, जे आपल्याकडे नाही. म्हणून अशा बालकांना खऱ्या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आपली जबाबदारी असल्याचे सौ. परब यांनी नमूद केले.
यावेळी मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सर्व विशेष बालकांना भोजन देण्यात आले. तसेच स्वतः पोलीस निरीक्षक यांनी अमोल चव्हाण यांनी या विशेष बालकांसोबत भोजनाचा आस्वाद घेत त्यांच्या जीवनात काही क्षण आनंद पेरण्याचे दैवी कार्य केले.
मतिमंद बालकांच्या विशेष बँड पथकाच्या स्वागताने भारावले पीआय अमोल चव्हाण
दरम्यान पोलीस निरीक्षक यांचे विशेष बालकांनी सुंदर अशा बँड पथकाने तालासुरात स्वागत केले. त्यांच्या या स्वागताने पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण अचंबित झाले व त्यांनी सर्व बालकांसोबत प्रेमाने हस्तांदोलन करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रुपेश पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेतून प्रा. पाटील यांनी मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा व राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक हेमंत साळुंके यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिस्टर लिसन, सिस्टर ब्रिसा, स्नेहा परब, हेमंत साळुंके, तनया मोरजकर, रश्मी रेडकर, ईशा सूर्याजी, हरीश नलावडे, भिवाजी आकेरकर, श्रीवर्धन आरोसकर, गौरव जाधव आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन मल्लसम्राट प्रतिष्ठानचे जावेद शेख, ललित हरमलकर, प्रा. रुपेश पाटील, नागेश सूर्यवंशी, बुधाजी हरमलकर, दशरथ गोंड्याळकर, देवेश पालव, गणेश राऊळ, किशोर हरमलकर, नासिर मकानदार, साबाजी परब, गौरव कुडाळकर, सुनील नेवगी, जयराम जाधव, फिजा मकानदार, कामाक्षी महालकर, मिताली राऊळ, दिपाली राऊळ, सान्वी बिद्रे, संचिता केनवडेकर, श्रुती सावंत व भाविका कदम यांनी केले.